पुणे

Loksabha election : भगवामय वातावरणात संजोग वाघेरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भगवामय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात वाजत-गाजत काढलेल्या रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.23) उमेदवारीअर्ज दाखल केला. या वेळी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार संजय जगताप, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, गौतम चाबुकस्वार व पदाधिकारी उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यापूर्वी पिंपरीगावात संजोग वाघेरे पाटील त्यांच्या निवासस्थानी पत्नी उषा वाघेरे यांच्यासह महिलांनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. रॅलीपूर्वी संजोग वाघेरे पाटील यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. तसेच, आराध्य दैवतांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर पिंपरीगावातून सकाळी रॅलीस सुरुवात झाली. पिंपरी चौक, चिंचवडगाव, आकुर्डी अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर आकुर्डी येथून पदयात्रा काढण्यात आली. त्यात सहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती

हातात मशाल चिन्ह, भगवे झेंडे, भगवे उपरणे, भगव्या टोप्या यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि आपचे झेंडेंही फडकत होते. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. आता हवा, खासदार नवा; आली रे आली, पाटलांची बारी आली, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मावळात गद्दाराला गाडून बदला घेणार

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही देशाची निवडणूक आहे. गद्दाराला गाडून बदला घेण्याची हीच वेळ आहे. गेल्या दहा वर्षांत कामे झाली नाहीत. येत्या पाच वर्षांत आम्ही काम करून दाखवू. मावळाचा गड उद्धव ठाकरे यांचा शिलेदार राखणार आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता विजयाचा गुलाल उधळणार आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT