पुणे

Loksabha election | पुणे काँग्रेसला धक्का? बागुल-फडणवीस भेटीने चर्चेला उधाण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ऐन लोकसभा निवडणुकीत बागुल यांच्या भेटीने ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नागपूर येथे ही भेट झाली. या वेळी बागुल यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव हेमंत व अमित हेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील जागेसाठी बागुल इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने बागुल नाराज झाले होते.
निष्ठांवतांना डावलले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी काँग्रेस भवनात निदर्शनेही केली होती. त्यानंतर ते धंगेकर यांच्या प्रचारापासूनही दूर होते. त्यातच सोमवारी त्यांनी थेट फडणवीस आणि बावनकुळे यांची भेट घेतली.

त्यामुळे नाराज बागुल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबाबत बागुल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. तर त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र बागुल हे लग्नानिमित्त नागपूर येथे गेले असताना ही भेट झाल्याचा दावा केला. स्वत: बागुल पुण्यात आल्यानंतर याबाबत काय ते माहिती देतील, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT