पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी लागणार असल्यामुळे कामाच्या 'वर्क ऑर्डर' मिळवण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत अधिकार्यांसह ठेकेदारांची चांगलीच धावपळ पहायला मिळाली. नगरसचिव कार्यालयात निविदांवर सह्या घेण्यासाठी गर्दी झाली होती. दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 300 कोटींच्या 175 हून अधिक प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी (दि.16) दुपारी लागणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निविदा काढण्यास आणि कामाची 'वर्क ऑर्डर' देण्यास तांत्रिक अडचणी येणार आहेत.
त्यामुळे स्थायी समितीची शेवटची बैठक शुक्रवारी झाली. आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जवळपास 300 कोटींच्या 175 पेक्षा अधिक निविदांना मंजुरी देण्यात आली. स्थायीने मंजुरी दिलेल्या निविदांच्या 'वर्क ऑर्डर' आचारसंहिता जाहीर होण्यापर्यंत मिळणे आवश्यक आहेत. त्यातच आज (शनिवारी) महापालिकेला सुटी आहे. त्यामुळे कामाच्या 'वर्क ऑर्डर' मिळवण्यासाठी अधिकार्यांसह आजी-माजी आमदार व माजी नगरसेवक आणि ठेकेदारांचीही धावपळ सुरू होती.
स्थायी समितीची शुक्रवारी सकाळी 11 नंतर बैठक झाली. या बैठकीत 95 प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 7 नंतर स्थायी समितीची बैठक झाली. त्यामध्येही अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नगरसचिव कार्यालयाचे काम सुरू होते.
शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा किंवा तातडीचा विषय असेल, तर तो स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी दाखल करून मान्य करण्यात येतो. मात्र, या नियमाचा दुरुपयोग केला जात आहे. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर महत्त्वाचे विषय आणले, तर त्याची चर्चा होते; पण आचारसंहिता शनिवारी लागणार असल्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत अनेक विषय दाखल मान्यतेसाठी आले.
हेही वाचा