राज्यात साखर उत्पादन शिगेला; इथेनॉल धोरणबदलाचा परिणाम ! | पुढारी

राज्यात साखर उत्पादन शिगेला; इथेनॉल धोरणबदलाचा परिणाम !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील यंदाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्याकडे झुकला असून, आजअखेर 986 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर, 10.14 टक्के उतार्‍यानुसार 100 लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाच्या धोरणात बदल केल्यानंतर राज्यात साखर उत्पादन वाढण्यास मदत झाल्याचे चित्र आहे. अद्यापही दोन ते तीन लाख टनांनी साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

राज्यात चालू वर्ष 2023-24 च्या हंगामात 103 सहकारी आणि 104 खासगी मिळून 207 साखर कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. त्यामध्ये 43 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, अद्यापही 164 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. कारखान्यांकडून पूर्णक्षमतेने ऊस गाळप सध्या होत नसून, ऊस टोळ्यांच्या उपलब्धतेनुसार शेवटच्या टप्प्यातील ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे राज्यात काही मोजक्याच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम 10 एप्रिलपर्यंत चालण्याचा अंदाज साखरवर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.
साखर आयुक्तालयाच्या हंगामाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार 88 लाख टन साखर उत्पादन, इथेनॉलकडे वळणारी 15 लाख टन साखर मिळून 103 लाख टनाचा अंदाज होता. इथेनॉल धोरण बदलल्याने चित्र बदलून साखर उत्पादनात अपेक्षेनुसार वाढ झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

केंद्र सरकारने ज्यूस आणि सिरपपासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली, तसेच बी हेवीपासूनही बंदीच आहे. त्यामुळे सी हेवीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उतार्‍यात वाढ होण्यावर झाला आहे. तर, जानेवारी आणि फेब—ुवारी महिन्यात काही भागांत झालेल्या पावसाचा चांगला परिणाम म्हणून उसाच्या उत्पादकतेत वाढ होऊन साखर उत्पादन वाढल्याचे दिसून येते. आणखी 2 ते 3 लाख टन म्हणजे राज्यात हंगामअखेर एकूण 103 लाख टनाच्या आसपास साखर उत्पादन होईल. राज्यात सध्या दैनिक अडीच ते लाख टन इतके ऊस गाळप सुरू आहे.

– संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई

कोल्हापूर विभागाचा डंका कायम

राज्यात झालेल्या ऊस गाळपात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागाने सर्वाधिक ऊस गाळप, सर्वाधिक साखर उत्पादन तयार केले असून, उतार्‍यातील अव्वल स्थान कायम राखले आहे. कोल्हापूर विभागाने 228.37 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले, तर 11.47 टक्के इतका सर्वाधिक उतारा मिळवीत 261.99 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. त्याखालोखाल पुणे विभागाने 209.35 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले, तर 10.42 टक्के इतक्या सरासरी उतार्‍यानुसार 218.15 लाख क्विंटल साखर उत्पादन घेत दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. तर, सोलापूर विभाग तिसर्‍या स्थानावर असून, त्यांनी 204.64 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले. तर, 9.31 टक्के उतार्‍यानुसार 190.47 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे.

 हेही वाचा

Back to top button