कोल्हापूर, हातकणंगलेचा पेच कायम; यादी रखडली | पुढारी

कोल्हापूर, हातकणंगलेचा पेच कायम; यादी रखडली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शनिवार (दि. 16) पासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असली, तरी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज उमेदवार असतील. याबाबत सर्व काही ठरले असले व शाहू महाराज यांनी प्रचार सुरू केलेला असला, तरी आघाडीकडून अद्याप त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही; तर हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायचा की, सत्यजित पाटील-सरूडकर यांना मैदानात उतरवायचे, याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का, याचीही अनिश्चितता कायम आहे.

हीच अवस्था महायुतीची आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे अनुक्रमे कोल्हापूर व हातकणंगलेचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, त्यांच्याही नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. एका जागेवर भाजपने हक्क कायम ठेवल्याने त्यांचेही जागावाटप रखडले आहे. मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी तर महायुतीची उमेदवारी मिळणार नसेल तर बंडखोरी करावी, असा सूर आळवला आहे. मात्र, मंडलिक गटाच्या मेळाव्यात बंडखोरीची वेळच येणार नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Back to top button