पुणे : मुळशी तालुक्याचा पूर्व भाग भुगाव, भुकूम, बावधन हे पुणे महानगरपालिकेला लागून आहे. परंतु, भुगाव आणि भुकूम येथे वीज, रस्ता, पाणी या मूलभूत सुविधांची वानवा आहे. भुगावमध्ये वाहतुकीची कोंडी ठरलेलीच आहे. विजेचा प्रश्न तर अतिशय गंभीर आहे. मुळशी तालुक्यामध्ये विजेचे एकच सबस्टेशन आहे. त्यामुळे त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण तालुका काही क्षणात अंधारात जातो. या सर्व समस्यांवर वेळीच उपाय होणे गरजेचे होते. परंतु, ते न झाल्याने तालुका विकासाच्याबाबात मागे राहिला आहे.
विकासकामांबाबत नागरिकांनी प्रश्न विचारले तर आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्हाला जागा मिळाली आहे. आम्ही फंड दिला आहे, अशी राजकीय उत्तरे दिली जातात. परंतु, जोपर्यंत नवे सबस्टेशन उभे राहत नाही तोपर्यंत आम्ही कोणावरही विश्वास ठेवणार नाही, असा पवित्रा मुळशीतील नागरिकांनी घेतला आहे.
पिरंगुटपर्यंत मुळशी प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी आले आहे. परंतु, काही ठिकाणी पाईपलाईन अनेक वेळा फुटते किंवा तांत्रिक बिघाड होतो. त्यामुळे कधी कधी तीन ते चार दिवस पाणी येत नाही. पाणी असूनही नागरिकांना पाण्याचे हाल सोसावे लागत आहेत. बावधन ते आदरवाडीपर्यंत, लवासापासून ते पेठ शहापूरपर्यंत असा विस्तार असलेल्या मुळशी तालुक्यात अनेक बॉलीवूड तसेच क्रिकेटपटूंचे फार्म हाऊस आहेत. एवढा हा तालुका सर्वांना आकर्षित करणारा आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या या तालुक्यातील रस्ते ज्या दर्जाचे हवे तसे झालेले नाहीत. येथे फिरायला येणार्या पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. विकासाच्या बाबतीत पाहिलं तर मागासलेला तालुका हीच मुळशीची ओळख आहे. तालुक्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचे म्हटले, तर कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह किंवा बालगंधर्व किंवा आणखी खासगी नाट्यगृहांचा आधार घ्यावा लागतो.
तालुक्यामध्ये तहसील कचेरीचे काम जोरात सुरू आहे. परंतु, पौड पोलिस ठाणे आजही ब्रिटिशकालीन कार्यालयामध्ये सुरू आहे. तेथील स्थिती बिकट आहे. काही वर्षांपूर्वी एका कंपनीला आग लागली. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर मुळशी तालुक्याला अग्निशमन केंद्र मंजूर झाले. त्याचे काम आता सुरू आहे. तालुक्यामध्ये अनेक मोठ्या समस्या आ वासून उभ्या आहेत. एकंदरीतच काय तर जी कामे मागील दहा-पंधरा वर्षांमध्ये होणे अपेक्षित होते ती कामे आजही झालेली नाहीत. तालुक्यात विकासाभिमुख नेतृत्व नसल्यामुळे तालुका आजही मूलभूत सुविधांबाबत धडपडत आहे.
हेही वाचा