पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजपासून सोळाव्या दिवशी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघांचा खासदार कोण, याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ अधिग्रहित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. सर्व विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांना मनुष्यबळा बाबतचा फॉरमॅट पाठविण्यात आला असून, त्यांना कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण शांततेत झाल्यानंतर निवडणूक यंत्रणेने सुस्कारा सोडला होता. दिवस-रात्र एक केलेल्या या यंत्रणेला आठवडाभराचा दिलासा मिळाला. यानंतर आता मतमोजणीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. यामुळे ही यंत्रणा पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आली असून, आता मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ अधिग्रहित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. तर पुण्याचे 13 मे रोजी पार पडले आहे. टपाली मतदानाची स्वतंत्र मोजणी टपाली मतदान मोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
सैनिकी मतदारांच्या टपाली मतपत्रिकांचे प्रारंभी स्कॅनिंग केले जाणार आहे. यानंतर या मतपत्रिका तसेच 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे होम व्होटिंग आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांचे टपाली मतदान मतपत्रिका लोकसभा मतदारसंघनिहाय एकत्र केल्या जातील. यानंतर हे टपाली मतदान मोजले जाणार आहे. प्रत्येक विधानसभेतील मतांच्या मोजणीसाठी प्रत्येकी 125 याप्रमाणे सहा मतदारल संघातील मोजणीसाठी सुमारे 750 कर्मचारी प्रत्यक्ष टेबलवर लागतील. याशिवाय इतर अधिकारी-कर्मचारी असे जवळपास हजारावर मनुष्यबळ मतमोजणीच्या दिवशी कार्यरत असेल. सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच बंदोबस्तकामी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असेल.
कर्मचार्यांची माहिती संकलित झाल्यानंतर प्रत्यक्ष कर्मचार्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यानंतर या कर्मचार्यांचे मतमोजणीचे दोन वेळा प्रशिक्षण होणार आहे. अखेरचे प्रशिक्षण मतमोजणी केंद्रावर होणार आहे. यानंतर संगणक प्रणालीव्दारे ड्रॉ पद्धतीने कर्मचार्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती होणार आहे.
– ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे
हेही वाचा