पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या लिपिक संवर्गातील तब्बल 960 म्हणजेच 50 टक्के कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच महापालिकेच्या अधिकार्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत, आरोग्य अशा अत्यावश्यक सेवा देणार्या विभागांना यातून वगळण्यात आले. मात्र, इतर विभागातील वर्ग 2, 3 व 4 मधील कर्मचार्यांना निवडणूक कामासाठी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लिपिक संवर्गातील 550 कर्मचार्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेऊन त्यांच्याकडून मतदान केंद्रनिहाय व्यवस्था उभी करणे, मतदार यादी अद्ययावत करणे आदी कामे जानेवारीपासून देण्यात आली आहेत. सध्या महापालिकेतील वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंतचे सुमारे 960 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वर्ग 2 मधील उपअभियंता, कार्यकारी अभियंता, प्रशासन अधिकारी, सहाय्यक आयुक्त असे 62 जण, वर्ग 3 मधील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक असे 664 जण व वर्ग 4 मधील 133 शिपाई तसेच 122 समूह संघटिका निवडणूक कामात रूजू आहेत. पुणे महापालिकेकडे शिक्षण मंडळातील कर्मचारी धरून एकूण 17 हजार 700 जणांचा कर्मचारी वर्ग आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेतील आधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले. त्यातच महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त दर्जाच्या अधिकारी बदल्यांचे सत्र सुरू आहे. आणखी काही अधिकार्यांची बदली होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांवर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. बदल्या आणि निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त्या यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा