पुणे

loksabha elecation | पुणे महापालिकेत खांदेपालट; आयुक्त ढाकणे, खेमनार यांची बदली

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. खेमनार यांची बदली साखर आयुक्त म्हणून करण्यात आली असून, त्यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढाकणे यांची नियुक्ती अद्याप कोठेही करण्यात आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. कुणाल खेमनार यांची 21 ऑगस्ट 2020 रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तीन वर्षे पाच महिने ते पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. खेमनार यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पृथ्वीराज बी. पी हे 2014 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

सहकार आयुक्तपदी नार्वेकर

राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधक या पदावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली करण्यात आली आहे. विद्यमान साखर आयुक्त अनिल कवडे हे येत्या 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यानंतर डॉ. खेमनार यांनी हा पदभार स्वीकारावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. सध्याचे सहकार आयुक्त सौरभ राव यांना नवीन पदस्थापना देण्यात आलेली नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT