पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचार करणार असल्याचे आपचे प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सोमवारी स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली, या वेळी फाटके पाटील बोलत होते. राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, राज्य संघटनमंत्री संदीप देसाई उपस्थित होते.
फाटके पाटील म्हणाले, जनतेचा विश्वासघात करून भ्रष्टाचार्यांना आपल्या पक्षात सामावून घेत भाजपला परत परत सत्ता हवी आहे, असा प्रकार लोकशाहीला घातक असल्यानेच आम्ही भाजपविरोधात प्रचार करणार आहोत. आम आदमी पक्ष हा इंडिया फ्रंटमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष असून इंडिया फ्रंटच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार पक्षाकडून या निवडणुकीसाठी केला जाणार आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील उमेदवारांनाच निवडून देण्याची जनतेला विनंती करणार आहे. संदीप देसाई म्हणाले, सगळे घोटाळेबाज हे भाजपाची वाट धरत आहेत आणि भाजपही त्यांचे दोन पावले पुढे होऊन स्वागत करत आहे. आम आदमी पक्ष हा नेहमीच भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत राहिला आहे. या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर, मीडिया सहसंयोजक अमोल काळे, निरंजन आढागळे आणि किरण कद्रे उपस्थित होते.
हेही वाचा