विजयाचे शिलेदार व्हा : पालकमंत्री हसन मुश्रीफ | पुढारी

विजयाचे शिलेदार व्हा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

उत्तुर, पुढारी वृत्तसेवा : नेत्यावरील प्रेम आणि निष्ठा यांची प्रचिती म्हणजे उत्तूरचा परिसर आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत विजयाचे शिलेदार व्हा, अशी साद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली. उत्तूर (ता.आजरा) येथे जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, या विभागातील जनतेने माझ्यावर प्रचंड प्रेम केले. मी सदैव त्यांच्या ऋणात राहील. या विभागातील मतदार मोठ्या संख्येने मुंबई, पुणे, इचलकरंजी, कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे. एक – एक मताची शिकस्त करून सर्वच्या सर्व मतदान आणण्यासाठी कंबर कसा.

खा. संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूरच्या जनतेने पाच वर्षे लोकसभेत काम करण्याची संधी दिली. जिल्ह्यातील रस्ते, पूल, रेल्वे, आरोग्य, शेती, क्रीडा, पाटबंधारे प्रकल्प, घरकूल योजना व विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी प्रचंड निधी खेचून आणला. त्या बळावर या निवडणुकीला सामोरे जात आहे.

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, महादेवराव पाटील-धामणे, संभाजीराव तांबेकर- चिमणे यांची मनोगते झाली. यावेळी काशीनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, दीपकराव देसाई, शिरीष देसाई, गणपतराव सांगले, संभाजीराव तांबेकर-चिमणे, गंगाधर हराळे, विष्णुपंत केसरकर, शिवलिंगअण्णा सन्ने, सुनील दिवटे, सुरेश खोत आदी उपस्थित होते.

ते वक्तव्य कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठीच

सेनापती कापशी येथील सभेत बोललेले, ‘परमेश्वर सुद्धा मंडलिक यांचा पराभव करू शकत नाही.’ हे वक्तव्य कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी होते. अनेक वर्षांपासून ही जुनी म्हण प्रचलित आहे. तरीही, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

टीका करणारे स्वतः मात्र हेलिकॉप्टरनेच आले

हेलिकॉप्टरच्या मुद्द्यावरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, कोणतीही निवडणूक असो, मी अत्यंत मनापासून ती लढत असतो. कार्यकर्त्यांनी एक – एक मताची शिकस्त करून परगावचे मतदान आणावे, यासाठी मी प्रत्येक निवडणुकीत अशी प्रेरणा देत असतो. परंतु; माझ्या वक्तव्यावर टीका करणारे माजी मंत्री पाटील स्वतः हेलिकॉप्टरनेच आले, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Back to top button