काश्मिरात निवडणूक प्रचारसभांवर लष्कर-ए-तोयबा हल्ल्यांच्या तयारीत | पुढारी

काश्मिरात निवडणूक प्रचारसभांवर लष्कर-ए-तोयबा हल्ल्यांच्या तयारीत

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी घटना घडवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाने रचलेला आहे. लष्करचे दहशतवादी तसेच स्लीपर सेलच्या सदस्यांनी मिळून विशेषत: भाजपच्या प्रचारसभांना टार्गेट करण्याची योजना आखलेली आहे.

पाकिस्तानातील यंत्रणांच्या संगनमताने लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जुनैद अहमद बट हा पाकिस्तानातून घुसखोरी करून काश्मीरमध्ये दाखल झालेला आहे. काश्मिरात दाखल होताच त्याने स्लीपरसोबत बैठकांचा सपाटा लावला आहे. भारतीय गुप्तचर संस्थांपर्यंत ही माहिती धडकताच सर्व संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. काही पथके सातत्याने जुनैदच्या मागावर आहेत.

गुप्तचर संस्थांनी सॅटेलाईट फोनवरून झालेले एक संभाषण इंटरसेप्ट केले होते. त्यातूनही जुनैद हा 31 मार्च रोजीच काश्मीरला पोहोचल्याचे समोर आलेले आहे. जुनैदच्या एका बैठकीत स्लीपर सेलचे 6 लोक हजर होते. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा आपला अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला असून, सर्व सुरक्षा यंत्रणांसाठी मंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला आहे. कुलगाम आणि आसपासच्या निवडणूक सभांसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

Back to top button