पुणे

Loksabha election 2024 : इंदापूरच्या राजकारणाला आता चढतोय रंग!

Laxman Dhenge

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात महायुतीत राजकारणाला रंग चढू लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी मेळावा घेऊन इंदापूरकरांना आपल्या बरोबर राहण्याची साथ मागितली. त्यानंतर महाविकास आघाडीनेदेखील यात आघाडी घेत इंदापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. राहुल मखरे यांना एकत्रित घेऊन शेतकरी मेळावा घेतला.

लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विधानसभेचे ठरवा, असा पवित्रा घेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कन्या भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, कोअर कमिटीचे तालुकाप्रमुख राजवर्धन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनीदेखील भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईला दोन वेळा भेट घेऊन पुन्हा फडणवीस यांना इंदापूरला आणण्यात यश मिळवले. त्यांच्याकडे तालुक्याचे पालकत्व देऊन लोकसभेची पर्यायाने विधानसभेची आपली जबाबदारी फडणवीस यांच्यावर टाकून महायुतीचा धर्म पाळण्याचा शब्द दिला. एकंदरीतच महाविकास आघाडी महायुती आणि भाजप यांनी आपली ताकद इंदापुरात दाखवून बारामती लोकसभेला रंग चढवला आहे.

सोनाई उद्योग समूहाचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरदचंद्र पवार गटात सहभागी होत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सर्व धुरा खांद्यावर घेत घड्याळापेक्षा तुतारी बरी, तुतारीचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवू, असे म्हणत प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, राजकारणातील धुरंदर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही गोष्ट हेरून हा युवा चेहरा आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. त्यासाठी महायुतीतील आपले सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर माने कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यानंतर रविवारी प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या घड्याळाला साथ दिली. दुसरीकडे राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य व यशवंत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले असून, त्यांना थेट प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपदी संधी दिली आहे.

माजी मंत्र्यांचे आणखी एक बंधू नाराज

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आणखी एक बंधू नाराज असल्याची चर्चा असून, ते लवकरच वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, असेदेखील समजते. यापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता हे दुसरे बंधूदेखील मागील 20 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, 2014 च्या विधानसभेत पाटील यांचा पराभव झाला. त्या वेळी काही कार्यकर्त्यांनी आपल्या जवळचे घरातील कुटुंबीय बाजूला ठेवा, असा सूर काढला आणि पाटील आडनावाच्या अनेकांना पदांपासून माजी मंत्री यांनी दूर ठेवले. मात्र, आता आपली इथे घुसमट होत असल्याचे बोलले जात असून, तेदेखील लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करतील, अशी चर्चा आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT