पुणे

Loksabha election 2024 | डॉन अरुण गवळी आणि खेड लोकसभा..

Laxman Dhenge

शिक्रापूर : मुंबईच्या : गुन्हेगारी जगतावर कधीकाळी अधिराज्य गाजवणार्‍या डॉन अरुण गवळी याने सन 1999 मध्ये तत्कालीन खेड व सध्याची शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती. 1997 साली अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना गवळी याने करत राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. या वेळी अरुण गवळी याने थेट लोकांमध्ये जाऊन संपर्क साधला होता. या निवडणुकीमध्ये गवळी याचा पराभव झाला असला तरी संपूर्ण प्रचारादरम्यान गवळी याचेविषयी मतदारसंघामध्ये मोठे कुतूहल होते. सन 1999 च्या दरम्यान अरुण गवळी याचे वास्तव्य त्याची सासुरवाडी व अखिल भारतीय सेनेच्या नेत्या आशा गवळी यांच्या वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे होते.

सत्ताधारी शिवसेना व अरुण गवळी यांच्यात कटूता निर्माण झाल्याने गवळी याने आपला मुक्काम वडगावपीर येथे हलविला होता, अशी चर्चा होती. वडगावपीर या गावाचा समावेश खेड लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याने गवळीने खेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. या काळातील वास्तव्यामध्ये अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते गवळी याच्या संपर्कात आले होते. गवळी याने परिसरातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी व गरजूंसाठी आर्थकि मदत केली होती. गवळीच्या या मदतीचा बोलबाला संपूर्ण मतदारसंघात झाला होता. संपूर्ण प्रचारादरम्यान राजगुरुनगर शहरामध्ये संपर्क कार्यालय स्थापन करून गवळी याच्या प्रचाराची सूत्रे इथून हलवली जात होती.

गवळी याच्या गुन्हेगारी जगतातील दबदब्यामुळे मतदार व कार्यकर्ते दबकून असले तरी संपर्काच्या निमित्ताने मोकळेपणा आला होता.
या निवडणुकीत अशोक मोहोळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेचे किसनराव बाणखेले यांचा पराभव करत निवडून आले होते. तर काँग्रेसचे राम कांडगे हे तिसर्‍या स्थानावर राहिले होते. चौथ्या स्थानावर राहिलेल्या अरुण गवळी याला 1.44 टक्के म्हणजे 9520 मते मिळाली होती. या वेळी 661353 एवढी मते वैध होती. मिळालेली मते पाहता गवळी याला राजकारणात मोठे अपयश आले होते. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खर्‍या अर्थाने गवळी याचा राजकीय प्रवेश झाला होता.

लोकसभा पराभवानंतर गवळी बनला आमदार

1999 च्या खेड लोकसभा मतदारसंघातून पराभव होत अपयश पदरी पडल्यानंतर सन 2004 मध्ये गवळी यांनी चिंचपोकळी- मुंबई या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करताना अरुण गवळी प्रथमच आमदार बनला. अरुण गवळी याने काँग्रेसचे उमेदवार मधु ऊर्फ अण्णा चव्हाण यांचा तब्बल बारा हजार मतांनी पराभव केला होता. तीन नगरसेवकदेखील मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. यानंतर 2009 साली झालेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये अरुण गवळीला पराभव स्वीकारावा लागला. राजकीय चढ-उतार पाहणार्‍या अरुण गवळीच्या राजकीय आयुष्याचा श्रीगणेशा मात्र खेड लोकसभा मतदारसंघापासून सुरू झाला होता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT