पुणे

Loksabha election 2024 : शिरूरला दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला..!

Laxman Dhenge

भामा आसखेड : शिरूर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खा. शिवाजी आढळराव यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. सकल मराठा समाजाकडून उमेदवार उतरविणार असल्याच्या हालचाली सुरू असून उमेदवार किती प्रभावी असणार यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे. शिरूरची निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असल्याने या निवडणुकीत दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
शिरूर निवडणुकीचा आज विचार केला तर आढळरावांच्या पाठीमागे आंबेगावचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादी पक्षाचे तब्ब्ल चार आमदार व एक मंत्री आणि भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे अशी ताकद आढळराव यांच्या पाठीमागे आहे.

विद्यमान खा. कोल्हे यांच्यासोबत शिरूरचे एकमेव आमदार अशोक पवार व काही माजी आमदार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळीही त्यांच्याकडे आहे. गावपातळीवर राबणारे पक्षाचे प्रभावी कार्यकर्त्यांची फळी कोल्हे यांच्याकडे कितपत आहे, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे एवढी मोठी ताकद असताना कोल्हेंचा उधळलेला चौफेर वारू कसा रोखायाचा हे मोठे आव्हान आढळरावांपुढे नक्कीच राहणार आहे. खा. कोल्हे भावनिक साद घालून प्रभावी भाषणात तरबेज आहेत. पाच वर्षांच्या काळात त्यांनी केलेली विकासकामे व संसदेतील भाषणे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. शिरूर मतदारसंघात महायुतीमध्ये असलेल्या पाच आमदार नेत्यांनी आपापल्या तालुक्यातून आढळरावांना मताधिक्क दिल्यास त्यांचे पुढील विधानसभेचे गणित अधिक सोपे होण्याची शक्यता आहे.

शिरूरमध्ये कोल्हेंकडे आमदारांची ताकद नसली तरी शरद पवारांना मानणारा मतदारसंघातील प्रत्येक तालुका अशी ओळख आहे. आपल्या राजकीय चातुर्य खेळीने अनेक भल्याभल्यांना राजकारणातून नेस्तानाबूत करणारे मुरब्बी आणि 'गेम चेंजर" म्हणून ओळखले जाणारे मोठे पवार ऐनवेळी कोणती खेळी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उबाठा शिवसेनेचे व काँग्रेसचे कार्यकर्ते हेही कोल्हेंसाठी जिवाचे रान करतील. प्रतिडाव टाकण्यात मोठ्या पवारांच्याच मुशीत तयार होऊन कसलेले अजित पवार हेसुद्धा कोणता डाव टाकतील याचा काहीच भरवसा नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात असंख्य प्रश्न प्रलंबित असून निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय मुद्दे व स्थानिक मुद्दे उपस्थित करून निवडणुकीतील उमेदवार आढळराव व कोल्हे कसा प्रचार करतात आणि मतदार राजाकडून दोन्हीना कसा प्रतिसाद मिळतो यावर बरेच अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT