Ketan Agarwal Murder Case Pune
पुणे

Lohagad Case Taxi Driver Statement: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण; टॅक्सीचालकाच्या जबाबात प्रवासातील संशयास्पद घटनांचा खुलासा

बाली प्रि-वेडिंगपूर्वी घडलेल्या घडामोडींवर पोलिस तपास केंद्रित; पासपोर्ट व वस्तू गायब होण्याच्या दाव्यांची पडताळणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: लोहगड येथे केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवे धागेदोरे समोर येत असताना, प्रि-वेडिंग शूटसाठी नियोजित बाली दौऱ्यापूर्वी घडलेल्या घटनांमुळे तपासाला आणखी एक नवा धागा मिळाला आहे. पुण्यातून मुंबई विमानतळापर्यंत केतन अग्रवाल व त्यांच्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या टॅक्सीचालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात प्रवासादरम्यान घडलेल्या काही संशयास्पद घटनांचा उल्लेख केला आहे. सिया गोयल सुरुवातीपासूनच बालीला जाण्यास इच्छुक नव्हती, तसेच फूड कोर्टवर वाहनातून काही वस्तू काढताना ती दिसल्याचा दावा चालकाने केला आहे. या जबाबाची पोलिस पडताळणी करीत आहेत.

टॅक्सीचालक वैभव जाधव यांच्या जबाबानुसार, प्रि-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्यासाठी पुण्यातून वाहन बुक करण्यात आले होते. मात्र, प्रवास सुरू होण्यापूर्वी सिया गोयल गाडीत बसण्यास तयार नव्हती. त्या वेळी तिचा भाऊ साहिल याने तिचा हात धरून तिला वाहनात बसवले. त्यानंतर पुणे ते रावेत या प्रवासादरम्यान सिया आणि साहिल यांच्यात वारंवार वाद होत असल्याचेही चालकाने आपल्या जबाबात नमूद केले आहे.

पुढे रावेत परिसरातून केतन अग्रवाल व त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाहनात बसल्यानंतर सर्वजण मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. प्रवासादरम्यान एका फूड कोर्टवर सर्वजण चहा-नाश्त्यासाठी थांबले. त्या वेळी सिया काही कारण सांगून एकटीच वाहनाकडे आली. वाहनातून काही वस्तू काढून ती स्वतःजवळ ठेवत असल्याचे आपण पाहिल्याचा दावा चालकाने केला आहे. त्या वेळी या प्रकाराकडे विशेष लक्ष गेले नाही.

मात्र, सर्वांना मुंबई विमानतळावर सोडल्यानंतर काही वेळातच केतन अग्रवाल यांनी चालकाला फोन करून आपला पासपोर्ट गाडीत राहिल्याची शक्यता व्यक्त करत चौकशी केली. चालकाने वाहनाची तपासणी केली असता पासपोर्ट मिळून आला नाही. त्यानंतर फूड कोर्टवर सिया वाहनातून काही वस्तू काढताना दिसल्याची बाब त्याच्या लक्षात आल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दरम्यान, तपासात यापूर्वीही केतन अग्रवाल यांचा पासपोर्ट फाडून महिलांच्या स्वच्छतागृहात टाकल्याचा आरोप समोर आला होता. बालीचा प्रि-वेडिंग दौरा रद्द व्हावा, या उद्देशाने हा प्रकार घडवून आणल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. टॅक्सीचालकाच्या जबाबामुळे या घटनाक्रमातील आणखी एक पैलू समोर आला असून, त्यातील प्रत्येक बाबीची स्वतंत्र पडताळणी पोलिस करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT