पुणे : देशात 'इंडिया' आणि राज्यात 'महाविकास आघाडी'ची मोट बांधली जात असतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. ‘आमचा वाईट काळ संपला आहे, आता आम्हाला स्वबळावर लढू द्या,’ अशा थेट शब्दांत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पुण्यात आयोजित काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला उपस्थित होते, ज्यांच्यासमोर वडेट्टीवार यांनी ही आग्रही भूमिका मांडली.
महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवण्याऐवजी स्वबळावर निवणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची इच्छा का आहे, हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘देशासाठी 'इंडिया आघाडी' आणि राज्यासाठी 'महाविकास आघाडी' गरजेची आहे, हे मान्य. पण स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असतात. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला हवा.’’
आपल्या मागणीला बळकटी देण्यासाठी त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘मागच्या निवडणुकीत आम्ही मुंबईत स्वबळावर लढून ३७ जागा जिंकल्या होत्या. हा आकडा विसरता येणार नाही. राजकारणात वाईट काळ येतो आणि जातो. आता आमची ताकद वाढली आहे आणि आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्यावी, ही आमची भावना आहे.’’
सध्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे. यावर विचारले असता वडेट्टीवार यांनी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा अविभाज्य भाग आहेत. पण दोन भावांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तर त्यांना आधी एकत्र येऊ द्या. त्यानंतर पुढचं पुढे बघू.’’ त्यांच्या या विधानाने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘पक्षाला कोणताही मोठा नेता तारू शकत नाही, तर तळागाळात काम करणारा कार्यकर्ताच तारू शकतो,’’ असे सांगत त्यांनी पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.
एकंदरीत, वडेट्टीवार यांच्या या स्पष्ट मागणीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा हा स्वबळाचा आग्रह मित्रपक्ष कसा स्वीकारतात, यावरच आघाडीचे स्थानिक पातळीवरील भवितव्य अवलंबून असेल.