पुणे: पुणे महापालिकेची फसवणूक करणार्या ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस कंपनीच्या महापालिकेत तैनात असलेल्या 626 सुरक्षारक्षकांना मे, जून आणि जुलै महिन्याचे अद्याप वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याप्रकरणी कंपनीवर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ईगल सिक्युरिटी कंपनीने महापालिकेची फसवणूक करून मुंबईमध्ये तैनात असलेल्या 200 सुरक्षा रक्षकांचे वेतन पुणे महापालिकेकडून घेतले होते. या प्रकरणात महापालिका प्रशासनाने कंत्राटदार कंपनीचे पैसे रोखले होते आणि 2 कोटी 70 लाख रुपये वसूल केले होते तसेच कंपनीला 71 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. दरम्यान, आता त्याच कंपनीने महापालिकेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन तीन महिन्यांपासून दिलेले नाही. (Latest Pune News)
मुख्य इमारती आणि इतर मालमत्तांवर पुणे महापालिकेकडून सुरक्षारक्षक नियुक्त केले जातात. कंत्राटी सुरक्षारक्षकांची नियुक्ती महापालिकेकडून केली जाते. एकाच कंपनीकडून इतक्या मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक नियुक्त केल्यानंतर कंपनीला काम पूर्ण करण्यात खूप संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सुरक्षा रक्षकांसाठीची निविदा तीन कंपन्यांना दिली होती. यामध्ये ईगल कंपनीला 626 सुरक्षा रक्षक नियुक्तीचे कंत्राट दिले होते.
कंत्राटदारांचा कार्यकाळ संपला आहे आणि नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे. ही निविदा ऑगस्ट 2025 मध्ये संपणार आहे. महापालिकेच्या झोन 1, 2 आणि 5 मध्ये तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक हे वेतनापासून वंचित आहेत.
या सुरक्षा रक्षकांनी महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाकडे याप्रकरणी तक्रारी करीत कंपनीच्या अधिकार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे.
कंपनीकडून दोनदा फसवणूक
पुणे महानगरपालिकेत तैनात असल्याचे सांगून मुंबईत काम करणार्या सुरक्षा रक्षकांचे पगार घेण्याचा पराक्रम ईगल कंपनीने केला आहे. या कंपनीने दोनदा महानगरपालिकेची फसवणूक केली आहे. यापूर्वीही कंपनीने कर्मचार्यांना मार्च महिन्याचे पगार उशिरा दिले होते.
आता पुन्हा या कंपनीने कर्मचार्यांचे पगार उशिरा केले आहेत. अशा परिस्थितीत कर्मचारी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. तसेच, कंपनीने महानगरपालिकेत जमा केलेली ठेव जप्त करून त्यातून सुरक्षा रक्षकांचे पगार देण्याची मागणी केली जात आहे.
महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या इतर कंपन्यांकडून बिले वेळेवर पाठवली जातात. परंतु, ईगल कंपनीकडून बिल वेळेवर पाठविले गेले नाही. फेब्रुवारीपर्यंतची बिले कंपनीला पाठविण्यात आली आहेत. त्याच वेळी मार्च आणि एप्रिलची बिलेदेखील 2 दिवसांत पाठविण्यात येतील.
- राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका