पुणे: अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राबरोबरच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून त्या अनुषंगाने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. (Latest Pune News)
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल 13 मे पूर्वीच जाहीर करण्यात येणार आहे.
त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्येच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशाचा भाग एक आणि दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यात येत असतो. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे.
...ही लागणार कागदपत्रे
1. इयत्ता दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
2. इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
3. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
4. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र
6. दिव्यांग प्रमाणपत्र
7. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
8. आजी- माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र
9. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र
10. अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र
11. परदेशातून येणार्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक
12. हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र (राज्य शासन/ केंद्र सरकार/ खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)