खडकवासला: तोरणा-मढे घाट परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. तोरणागडाच्या पायथ्याला वेल्हे बुद्रुकमध्ये बिबट्यांनी एक बैल व गाय अशा दोन जनावरांचा फडशा पाडला. या परिसरात तीन बछड्यांसह बिबट्याची मादी तसेच आठ- दहा बिबट्यांचा वावर आहे. शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री अशा लहान पाळीव जनावरांसह गाय, बैल अशा मोठ्या जनावरांचा फडशा बिबटे पाडत आहेत. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. रस्त्याने ये- जा करतानाही बिबटे दिसत असल्याने विद्यार्थ्यांसह पर्यटकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी (दि.13) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वेल्हे बुद्रुकमधील रानात सगुणाबाई लखू ढेबे यांच्या मालकीच्या गायीचा बिबट्याने जागीच फडशा पाडला. त्या आधी सगुणाबाई ढेबे यांच्या मालकीचा बैल बिबट्याने रानात मारला. मात्र, मृत बैलाचे अवशेष सापडले नाहीत. राजगड तालुका वन विभागाच्या वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक स्वप्निल उंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे म्हणाल्या, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गायीचा पंचनामा करण्यात आला आहे. शासकीय नियमानुसार शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे म्हणाले, तोरणा गडाच्या पायथ्याला असलेल्या वेल्हे - केळद रस्त्यावर भट्टी खिंडीत शुक्रवारी (दि.12) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून घराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बिबट्यांचे तीन बछडे व एक मादी दिसली. या भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ये- जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी, पादचारी, पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
सायंकाळी येणे- जाणे धोक्याचे
तोरणा, घिसर, केळदच्या डोंगरी पट्ट्यात कुत्री, वासरे, शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे रानात जनावरांना घेऊन चारण्यासाठी जाणे तसेच सायंकाळी सहानंतर रस्त्याने एकटे दुचाकीवरून तसेच पायी चालत येणे धोक्याचे झाले आहे.
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरी वस्त्या, रस्ते अशा ठिकाणी वारंवार बिबट्या येत आहेत, त्या गावात, वाड्या- वस्त्यांत वन विभागाने जनजागृती सुरू केली आहे. सायंकाळनंतर पर्यटकांना वनक्षेत्रात जाण्यास प्रतिबंध केला आहे. राजगड तालुक्यात पन्नासहून अधिक बिबटे आहेत.अनिल लांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजगड तालुका वन विभाग