पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी : वाहतूक ठप्प

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे – नाशिक महामार्गावर कळंब गावचे हद्दीत वर्पे मळा येथील हॉटेल आपुलकी जवळ गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील बिबट्या रस्त्यावर बराच वेळ पडून राहिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमी अवस्थेत बिबट्या नागरिकांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.

घटनास्थळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वहातुक अंमलदार मंगेश लोखंडे, संतोष कोकणे, वारूळवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, बॉबी ढवळे, रेस्क्यू टीम सदस्य मिलिंद टेमकर, किरण वाजगे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वहातूक सुरळीत होण्यास मदत केली. बिबट्याचा आपघात झाल्याची माहिती कळताच मंचर वनविभागाच्या वन क्षेत्रपाल स्मिता राजहंस, नारायणगाव वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, नितीन विधाटे, माणिक डोह बिबट निवारा केंद्रातील महेंद्र ढोरे घटनास्थळी दाखल पोहचले..

महेंद्र ढोरे यांनी बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जखमी बिबट्याला पिंजऱ्यामध्ये घालून माणिक डोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान गेल्या काही दिवसात पुणे नाशिक महामार्गावर मंचर ते चौदा नंबर दरम्यान रात्रीच्या वेळी वाहनाची धडक बसून सुमारे दोन कोल्हे व दहा बिबटे, व एक तरस प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. " वाहने सावकाश चालवा, बिबट्या रस्ता ओलांडत आहे " अशा आशायचे बोर्ड अनेक ठिकाणी लावले आहेत.

दरम्यान बिबट्याचे मानवावर व प्राण्यावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे वन कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. सततच्या धावपळीमुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडू लागले आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्या कोणाला बिबट्या दिसतोच . तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी होते. पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला केल्यावर पंचनामा लगेच करावा लागत आहे. त्यातच वेळेत कर्माचारी पोहचले नाही अगर पिंजरा वेळत लावला नाही तर काही ठिकाणी वादावादी होताना पहायला मिळत आहे.या सगळ्या धावपळीने वन कर्मचारी मेटकुटीला आले आहेत. जनतेनेसुद्धा वन कर्मचाऱ्यांना समजून घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे. पिंजऱ्यात भक्ष ठेवणे, पिंजरा शेतात लावणे यासाठी वन कर्मचाऱ्यांना जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ वन विभागाची जबाबदारी आहे असे म्हणून हात झटकणे उचित होणार नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT