ओतूर : पुढारी वृत्तसेवा
ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील आवळी मळा येथे शेतकरी दीपक ज्ञानेश्वर गाढवे यांच्या गट नंबर २६४ मधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला ओतूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
हा पुर्ण वाढ झालेला बिबट्या असून अंदाजे ४ वर्ष वयाचा असल्याचे वनविभागाचे वनपाल गीते यांनी दै. "पुढारी"ला माहिती देताना सांगितले. सोमवारी (दि. २८) मध्यरात्री भक्षाच्या शोधात असताना अंधारात तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी विहिरीत बिबट्या पडल्याची खबर दीपक गाढवे यांनी फोन करून दिली असता, ओतूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनरक्षक अतुल वाघोले, फुलचंद खंडागळे, वनपाल गीते तसेच मानिकडोह बिबट निवारा केंद्रातील रेस्क्यू टीमचे डाॅ. मनोहर ढोरे व टीममधील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यास विहिरीबाहेर सुखरूप काढून पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले.