पुणे

Leopard News : काळवाडी येथे बिबट्याला पकडण्यात अखेर यश

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा काळवाडी परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये चार ते पाच वर्षाची मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. हा बिबट्या सोमवारी (दि. २०) पहाटे पाच वाजेच्या सुमारास जेरबंद झाला. काळवाडी, उंब्रज पिंपळवंडी, पिंपरी पेंढार परिसरामध्ये वन विभागाने ३० हून अधिक पिंजरे लावले असून गेल्या १० दिवसांमध्ये हा आठवा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे. काळवाडी या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद झालेले बिबट्याची मादी असून तिचे वय सुमारे चार ते पाच वर्षे असावे असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या १० दिवसापासून वन विभागाने पकडलेले हे आठही बिबटे माणिकडोह निवारा केंद्रात आहेत. यातील एकही बिबट्या सोडून दिलेला नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे हा आठ वर्षाचा मुलगा बिबट्याने ठार केल्यानंतर त्या ठिकाणी मोठा आक्रोश निर्माण झाला होता. त्यावेळी पकडलेले बिबटे यापढे सोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी नागरिकांची होती. त्यानुसार उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यापुढे पकडलेले बिबटे सोडून दिले जाणार नाही अशी ग्वाही दिली होती.

दरम्यान सध्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याचे दररोज कुठे ना कुठे कानावर येत आहेत. प्रामुख्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्या अधिक प्रमाणात हल्ले करतोय. पिंपरी पेंढार परिसरामध्ये देखील पिंजरे लावण्यात आले आहेत. नानुबाई कडाळे ही४ ५ वर्षाची महिला पिंपरी पेंढार या ठिकाणी बाजरी पिकाचे राखण करत असताना बिबट्याने त्या महिलेवर हल्ला करून ठार केले होते. पिंपळवंडीच्या लेंडेस्थळ या ठिकाणी पिकाची खुरपणी करत असलेल्या २४ वर्षीय हुळवळे या महिलेला बिबट्याने उसाच्या पिकात नेऊन गंभीर जखमी केले होते.

त्या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. पिंपरी पेंढार या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर स्थानिक लोकांनी मोठा आक्रोश निर्माण झाला होता. एका महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की देखील झाली व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाचे शब्दांमध्ये शिवीगाळ झाल्याचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका वन कर्मचारी महिलेचा कोणीतरी गळा आवळल्याने त्या महिलेवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. पिंपरी पेंढार या ठिकाणी झालेल्या गदारोळामुळे वन विभागाने ओतूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांच्या विरोधात आणि तीन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सध्या बिबट्या आणि मानव संघर्ष पाहायला मिळतोय. परंतु पिंपरी पेंढार या ठिकाणी झालेला प्रकार आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा यामुळे भविष्य काळामध्ये वनविभाग आणि जनता असा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या बिबट्याचा प्रादुर्भाव जुन्नर तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात असल्यामुळे वनविभाग व जनता यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन बिबट्याचा कायमचा बंदोबस्त कसा करता येईल आणि सरकारने याबाबतचे नियोजन लवकरात लवकर करावे यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT