वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोर्यात मादीसह चार बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत एक गाय व दोन शेळ्यांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे. या घटनांमुळे परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे. तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील टेकपोळे, माणगावच्या दुर्गम भागात एका मादीसह चार बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. टेकपोळे येथील आंब्याचा दांड धनगर वस्तीतील गंगाराम लक्ष्मण ढेबे हे बुधवारी (दि. 6) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील पाणवठ्यावर जनावरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होते.
त्यावेळी झुडूपात दबा धरून बसलेल्या बिबट मादीने जनावरांवर हल्ला केला. जनावरे सैरावैरा पळाली. त्या वेळी एक दुभती गाय मादीच्या तावडीत सापडली. मादीसोबत तिचे दोन धष्टपुष्ट बछडे होते. जिवाच्या आकांताने गंगाराम ढेबे गाईला सोडून धावत घरी आले. रात्र झाल्याने गुरुवारी (दि. 7) सकाळी गावकर्यांसह ढेबे रानात गेले. त्यावेळी गायीचा फडशा पाडल्याचे त्यांना दिसले. तर दुसरी घटना बुधवारीच माणगाव येथे घडली. आकाश सांगळे यांच्या दोन शेळ्यांचा फडशा बिबट्यांनी पाडला. पानशेत वन विभागाचे वनरक्षक स्वप्निल उंबरकर यांनी गुरुवारी घटनास्थळी दाखल होत पंचनामे केले.
पानशेत वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळ म्हणाल्या, रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यात बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांच्या हल्लात मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार संबंधित शेतकर्यांना दिली जात आहे. पानशेतसह परिसरातील जंगलात बिबटे तसेच वन्यप्राण्यांचे अधिवास क्षेत्र आहे. गुराख्यांनी वनक्षेत्रात रात्रीच्या सुमारास जाऊ नये असे आवाहन वेल्हे विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांनी केले आहे. तर टेकपोळेच्या सरपंच मंगल बामगुडे म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. पाळीव जनावरांवर बिबटे हल्ले करत आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
हेही वाचा