पुणे

Leopard News | डावखरवाडी येथील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Sanket Limkar

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : आळे (ता. जुन्नर) परिसरातील डावखरवाडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरूवारी (दि. ३०) पहाटे ५ वाजेच्या वेळेस बिबट्या जेरबंद झाला. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

आळे, आळेफाटा, वडगाव आनंद परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. आळे परिसरातील आगरमळा, तितरमळा येथे सहा महिन्यांपूर्वी बिबट्याचे हल्ल्यात चार वर्षीय बालक ठार झाले होते. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १४ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या परिसरातून त्यावेळी ६ बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाले होते. तसेच याच पुर्व भागातील काळवाडी, पिंपरीपेंढार येथे लहान मुलासह महिला बिबट्याचे हल्ल्यात मृत झाले होते. आजतागायत त्या परिसरात ८ बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले आहेत.

आळे परिसरातील डावखरवाडी येथेही बिबट्याचा वावर असून काही दिवसापासून ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत होते, तसेच त्याचे पशुधनावर हल्ले सुरू होते. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने वनविभागाकडे मागणी करण्यात आली. १० दिवसांपूर्वी डावखरवाडी येथील जयश्री सागर डावखर यांचे शेताच्या बांधावर वनविभागाने पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्या नर जातीचा असून तीन वर्षे वयाचा असल्याची माहिती आळे वनपरिक्षेत्र वनपाल संतोष साळुंखे यांनी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT