बेल्हे: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळुंचवाडी येथील घोडकेवस्तीवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. येथील जाधव यांच्या घराच्या सात फूट उंच संरक्षक भिंतीवरच चढून दोनवेळा हल्ला केला आहे. या प्रकारामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
?याबाबत सागर जाधव म्हणाले की, बिबट्याने त्यांच्या बंगल्याच्या 7 फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत येऊन दोनवेळा हल्ला केला आहे. यापूर्वी बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यात कुत्रा गंभीर जखमी झाला होता. (Latest Pune News)
त्याला सुमारे 50 टाके पडले होते. जाधव यांनी सुमारे 40 ते 50 हजार रुपये खर्च करून कुत्र्याचे प्राण वाचविले. आत्ताच्या दुसर्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आत्त. त्यात बिबट्या स्पष्ट दिसत असून, दोन्ही कुत्रे जाळीमध्ये बंद असल्यामुळे त्यांचा जीव बचावला.
मागील काही दिवसांत बिबट्याने जाधव यांच्या घरावर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला. वन खात्याकडे वारंवार तक्रार करूनही पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सागर जाधव यांनी केला. घरातील एखाद्या सदस्याचा जीव गेल्यावरच खाते जागे होणार का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री व दिवसाही घराबाहेर पडणे लोकांना भीतीदायक वाटू लागले आहे. वन खात्याकडे अनेकवेळा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत लोकांची बाहेर वर्दळ असते. अशा परिस्थितीत एखादी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येतनाही, अशी भीतीही नागरिक व्यक्त करीत आहेत.