बारामती: गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवात बारामती शहर व परिसरात शुक्रवारी (दि. 29) दमदार हजेरी लावली. दुपारी साडेचारला सुरू झालेला पाऊस दीड तासाहून अधिक काळ सुरूच होता. दमदार पावसाने नागरिक कमालीचे सुखावले.
गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर बारामती शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बारामती शहरात जोरदार पाऊस बरसला. (Latest Pune News)
पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केल्याने शेतातील कामे रेंगाळणार आहेत; शिवाय पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी होते.
शहरात तांदूळवाडी, जळोची, रुई, एमआयडीसी तसेच शहर, उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नुकत्याच संपलेल्या श्रावण महिन्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या श्रावण सरी कोसळल्या होत्या. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना पावसाने दिलासा मिळाला.
जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. परंतु, त्यानंतर ऑगस्टमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. ऑगस्टअखेरीस त्याने दमदार साथ दिली. शुक्रवारी सायंकाळी बारामती शहर, उपनगर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. नोकरदार आणि विद्यार्थ्यांना या पावसाचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.
संततधार पावसामुळे खरिपातील पिकांना फायदा होणार आहे. बारामती तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या वीर धरणात मुबलक पाणीसाठा साठल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. निरा खोर्यातील वीर, भाटघर, निरा देवघर आदी धरणे भरल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.