मांडवगण फराटा: मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात दोन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतीकामे ठप्प झाली आहेत. दुसरीकडे फ्लॉवर पिकाचेही दर कोसळले आहेत. परिणामी, तोडलेला फ्लॉवर शेतातच टाकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
येथील अनेक शेतकर्यांनी उसामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवरचे पीक घेतले आहे. सध्या फ्लॉवर तोडणीस आले आहे. मात्र, पावसामुळे या कामास अडचण येत आहे. असे असतानाही शेतकर्यांना मजुरांकडून फ्लॉवर काढणी करण्यात आली. मात्र, बाजारात फ्लॉवरला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे खर्च करूनही शेतकर्यांवर तोडलेला माल शेतातच टाकण्याची वेळ आली आहे. (Latest Pune News)
या परिसरातून दररोज 10 ते 12 पेक्षा अधिक ट्रक माल विक्रीसाठी बाहेर जातो. सध्या मात्र बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. फ्लॉवरला प्रतिकिलो 15 ते 20 रुपये इतका दर मिळतोय, तोही चढ-उतारासह. त्यामुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कांद्यालाही बाजारभाव नाही.
परिणामी, वखारीत साठवलेला कांदा सडू लागला आहे. चांगल्या प्रतीचा कांदाही बाजारात पाठवून शेतकर्यांना तोटाच सोसावालागत आहे. याबाबत शेतकरी माऊली जगताप म्हणाले की, शेती करताना प्रचंड खर्च होतो.
मजुरीही परवडत नाही. आता बाजारभाव मिळत नाही, मग शेती कशी करायची? फ्लॉवर व्यापारी बबनराव पोटोळे म्हणाले की, पावसामुळे फ्लॉवर खराब होतोय. त्यामुळे बाजारात दर पडले आहेत. मांडवगण फराट्यातून दिल्लीला मोठ्या प्रमाणात फ्लॉवर जातो.पण, सध्या मागणी कमी झाली आहे.