पिंपरखेड : ऊसतोड हंगाम सुरू झाला असून बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मानव आणि बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, यासंदर्भात जुन्नरचे उप-वनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी बिबटप्रवण क्षेत्रातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात, असे पत्राद्वारे सूचित केले आहे.(Latest Pune News)
बिबट्याच्या हल्ल्यात शिरूर तालुक्यातील जांबुत आणि पिंपरखेड परिसरात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागातील मागील तीन वर्षात बिबट्यांच्या हल्ल्याची व मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्यांची संख्या पाहता पिंपरखेड (ता. शिरूर) येथील घटनेदरम्यान संतप्त नागरिकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान वन विभागाच्या वाहन व कार्यालय या शासकीय मालमत्तेची जाळपोळ केली होती. या वेळी संतप्त नागरिकांचा संताप पाहता वन विभागाने ॲक्शन मोडवर येत तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात करत सुमारे 12 बिबटे जेरबंद करून 1 बिबट ठार करण्यात यश मिळविले आहे.
या भागातील बिबट्यांची संख्या पाहता उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखाना (जुन्नर), भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (आंबेगाव), घोडगंगा सहकारी साखर कारखाना, व्यंकटेश कृपा साखर कारखाना आणि पराग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना (शिरूर) यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेऊन योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी पत्राद्वारे सांगण्यात आले.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागाचे क्षेत्र हे जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण व शिरूर या वनपरिक्षेत्रामध्ये विभागलेले आहे; मात्र या संपूर्ण परिसरात सुमारे 70 टक्के उसाची शेती असून बिबट्याला लपण्यासाठी तसेच अन्न आणि पाणी योग्य प्रकारे मिळत असल्याने त्याची याच ठिकाणी गुजरान होत आहे. त्याला वास्तव्य करण्यासाठीची परिस्थिती अनुकूल आहे. या बाबींचा विचार करता सध्या ऊसतोड हंगाम सुरू झाला असून मागील घटना या सप्टेंबर ते डिसेंबर या काळात अधिक प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. याआधी अनेकदा ऊसतोड कामगारांवर देखील बिबट्याचे मोठ्या प्रमाणात हल्ले झालेले आहेत.
हे हल्ले टाळावयाचे असतील तर ऊसतोडणी करण्यासाठी आलेल्या ऊसतोड मजुरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना रहदारी व वास्तव्य करण्यासाठी कारखान्यांनी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात अनेक ठिकाणी ऊस तोडणी कामगार हे प्रत्येक गावात मोकळ्या जागेवर झोपड्या तयार करून राहात असल्याचे दिसून येत असून त्यांच्या दृष्टीने हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बिबटप्रवण क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या सुमारे 233 गावांमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत मानव-बिबट संघर्षाच्या अनुषंगाने हे क्षेत्र आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. यामुळे जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील मानव- बिबट संघर्ष कमी करण्यासाठी जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड या चार तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यकक्षेतील साखर कारखाना प्राधिकरणाने ऊसतोड हंगामामुळे आलेल्या मजुरांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे, ऊसतोड मजूर कामगारांच्या मुलांची विशेष काळजी घेऊन सोयी करणे, त्याचबरोबर फक्त दिवसाच्या उजेडात ऊसतोड करणे आणि ज्या भागात ऊसतोड चालू आहे त्या क्षेत्रात बिबट्याची पिल्ले आढळल्यास त्याची माहिती वन विभागास देणे यासंदर्भातील उपाययोजना करण्यासाठी कारखान्यांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.