जांबुत येथील ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू Pudhari
पुणे

Leopard Attack Jambut Pune: शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; जांबुत येथील ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

आठ दिवसांत दुसरी घटना; परिसरातील ग्रामस्थांचा वनविभागावर संताप, अधिक पिंजरे लावण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून आठ दिवसापूर्वी पिंपरखेड (ता. शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. २२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास जांबुत (ता. शिरूर) थोरातवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२) महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या सणात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने दु:खाचे सावट पसरून संपूर्ण बेट भाग हादरून गेला आहे.(Latest Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, भागुबाई जाधव ही महिला सकाळी सहा वाजेच्या सुमारास लघुशंकेच्या निमित्ताने घराबाहेर आल्या. यावेळी घराच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घरापासून ५०० फुटावर असलेल्या उसाचे शेतात नेऊन ठार केले. त्या बाहेरून घरात न आल्याने त्यांच्या मुलाने पाहिले असता त्यांना रक्त दिसल्याने त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोधाशोध केली असता जवळच्या ऊसाच्या शेतात त्या मृत अवस्थेत आढळून आल्या.

हल्ल्याच्या या घटनेने बेट भाग हादरून गेला आहे. गेल्या आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची ही दुसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवन्या बोंबे मृत्यू प्रकरणानंतर या भागात १०० पिंजरे लावण्यात येतील, असे निर्देश जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे यांनी दिले होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी पंचतळे (ता. शिरूर) येथे सहा तास रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला होता. जांबुत, पिंपरखेड आणि परिसरात बिबट्यांची संख्या ही ३०० च्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने योग्य वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती अशा संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

जांबुत आणि परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य ठार होण्याची ही आठवी घटना असून या आधीच्या काळात वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती; मात्र शेतकऱ्यांच्या मागणीला वनविभागाकडून थेट केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. शिवन्या बोंबे हिचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरखेड परिसरात केवळ दहा पिंजरे लावण्यात आले होते. सध्याचे स्थितीत फक्त सात पिंजरे कार्यान्वित असून बिबट्यांची संख्या पाहता या भागात अधिकचे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती; मात्र ठोस उपाययोजना करण्यास वनविभागाची उदासीनता दिसून आल्याने हे बळी गेले आहेत अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

अजून किती बळींची वाट पाहणार

जांबुत आणि पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत मृत्यू झाल्याची ही आठवी घटना असून वनविभागाकडून गांभीर्याने दखल घेतली नसल्याने आजही हल्ले सुरूच असून बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शासन अजून किती बळींची वाट पहाणार ?अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT