मंचर: शेतात गेलेल्या शेतकर्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील खडकी (बांगर-भोरवस्ती) येथे गुरुवारी (दि. 10) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेश सयाजी वाबळे (वय 55) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
वाबळे हे त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातील गवारीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. याच शेतालगतच्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याचा पंजा त्यांच्या डोक्याला लागला असून डोक्याला मोठी जखम झाली आहे. (Latest Pune News)
त्यांनी बिबट्याला प्रतिकार केल्याने बिबट्या पळून गेला व ते जखमी अवस्थेत घरी आले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती कळतात वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक प्रदीप औटी यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन दिवसांपूर्वी येथील शेतकरी मंजाबा महादू बांगर यांच्या कालवडीची शिकार बिबट्याने केली.
सततच्या बिबट्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे खडकी परिसरात पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक शेतकर्यांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने अवसरी-गावडेवाडी रेस्क्यू टीमच्या माध्यमातून तीन पिंजरे लावण्याची तयारी केली असल्याची माहिती दिली.