खेड शिवापूर: खेड शिवापूर येथील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पहिल्याच पावसात त्यावर खड्डे पडले होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले कासुर्डी (ता. भोर) गाव, खेड शिवापूर, शिवाजीनगर वस्ती येथील नागरिकांना जाणारा रस्ता आणि विशेष बाब म्हणजे शिवभूमी विद्यालय व मिशन स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेकडे जाणार्या रस्त्याचे काम जाणीवपूर्वक बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
पुणे- सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील उड्डाणपूल सुमारे तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला. महामार्गाची वाहतूक सुरू झाली; मात्र याचवेळी संबंधित ठेकेदाराला कासुर्डी गावात, खेड शिवापूर गावात, खेड शिवापूर वस्तीत, तसेच शिवभूमी विद्यालय, मिशन स्कूलमध्ये जाणार्या रस्त्याकडे किंबहुना रस्त्याच्या काम करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रोजच अपघात होत आहेत. मागील महिन्यात याच ठिकाणी अपघात होऊन गोरगरीब जनतेला लाखो रुपये दवाखान्यात खर्च करावे लागले. (Latest Pune News)
त्यामुळेच हा रस्ता कधी पूर्ण होणार? विद्यार्थ्यांचे हाल कधी संपणार? स्थानिक नागरिकांसह कामगारांना नवीन रस्ता कधी मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उड्डाणपूल आणि रस्ते करणारा ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
ठेकेदारावर कोण मेहेरबान?
खेड शिवापूर उड्डाणपूल करणार्या ठेकेदाराने संथगतीने काम करून उड्डाणपूल सुरू केला; मात्र तीनच महिन्यांत उड्डाणपुलावर खड्डे पडले होते, यावरून कामाची योग्यता स्पष्ट होत आहे. त्यातच सेवा रस्त्याचे काम तब्बल तीन महिने बंद असून याचा नाहक त्रास विद्यार्थी, स्थानिक नागरिकांना होत असून याची दखल घेतली जात नाही. ठेकेदारावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेहेरबान आहे का? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.
30 मीटर उड्डाणपूल चोरीला गेल्याची चर्चा
खेड शिवापूर उड्डाणपुलाची लांबी जेवढी पाहिजे त्यापेक्षा 30 मीटरने कमी केली गेली आहे, अशी चर्चा या भागात सुरू आहे. यामुळे शिवगंगा खोर्यातील नागरिकांमध्ये खेड शिवापूर येथील 30 मीटर उड्डाणपूल चोरीला गेल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
या रस्त्याने आमच्या गावातील व भागातील गावांमधून विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात येतो. पूर्वीही या ठिकाणी अपघात झाले आहेत. त्यामुळे भविष्यात जर एखादी दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न सचिन बबन कोंडे यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना उपस्थित केला.