

खेड: मैत्रिणीच्या घरातून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून ते गळ्यात घालून व्हॉट्सअप स्टेटसवर फोटो टाकणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. या स्टेटसमुळे चोरीचा छडा लागला आणि खेड पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. शितल वायदंडे (वय ३३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनम सत्यावान आदक (वय ३६, रा. आर्या रेसीडन्सी, पडाळवाडी रोड, थिगळस्थळ, राजगुरूनगर, ता. खेड) यांच्या घरात २०२१ मध्ये शितल वायदंडे भाड्याने राहत होती. यावेळी दोघींची चांगली मैत्री झाली होती. (Latest Pune News)
शितल ही अधूनमधून पुनम यांच्या घरी येत-जात होती. पुनम यांनी आपले सोन्याचे दागिने (मंगळसुत्र, नेकलेस, कानातले, टॉप्स, चैन, अंगठ्या, सासूचे मणी, वेल, बदाम आदी) कपाटातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले शितलने पाहिले होते.
काही काळानंतर शितल आणि तिचा पती शेजारील बिल्डिंगमध्ये राहायला गेले, पण मैत्रीमुळे तिची पुनम यांच्या घरी ये-जा कायम होती. दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी पुनम यांच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी दागिने काढण्यासाठी कपाट उघडले असता दागिने गायब असल्याचे आढळले.
घरातील सर्वांना विचारपूस केली, तसेच शितललाही याबाबत विचारले, पण तिने आरोप फेटाळले. नातेवाईक आणि मैत्रिणींचा त्रास होऊ नये म्हणून पुनम यांनी तेव्हा पोलिसांत तक्रार केली नाही. मात्र, मे २०२५ मध्ये शितलच्या बहिणीचे व्हॉट्सअप स्टेटस पाहताना पुनम यांना चोरी गेलेले दागिने शितल आणि तिच्या बहिणीच्या गळ्यात दिसले. यानंतर त्यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
खेड पोलिसांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या पुराव्यावरून शितल वायदंडे यांना ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे चोरी उघडकीस येण्याची ही पहिलीच घटना आहे.