मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिंपळगाव घोडा येथील सतीचा मोढा (ठाकरवाडी) येथे दोन बिबट्यांच्या हल्ल्यात 6 शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटे घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतमजुरी करणाऱ्या चंद्रकला ज्ञानेश्वर मधे यांच्या घरासमोरील गोठ्यात पहाटे साडेचारच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 6 शेळ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये मधे यांचे अंदाजे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याच भागात याआधीही बिबट्याच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.(Latest Pune News)
महिन्याभरापूर्वी शेतकरी अश्विनी सुखदेव मधे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. तसेच मेंढपाळ ज्ञानदेव सुळ यांच्या वाड्यावर वारंवार बिबट्याचे दर्शन झाले असून, कोंबड्या आणि कुत्री फस्त केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इयत्ता नववीतील विद्यार्थी आशितोष लोहकरे याच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘लवकरच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जाणार आहे,’ असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिंबकर यांनी सांगितले.
महाळुंगेत बिबट्याकडून मेंढरू फस्त
आंबेगावच्या तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्यांचा धुमाकूळ
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महाळुंगे पडवळच्या चासकर मळ्यात शनिवारी (दि. 8) दुपारी बिबट्याने दौलत वनकुटे यांच्या मेंढरांच्या कळपावर हल्ला करत एका मेंढराला फस्त केले. ही माहिती माजी सरपंच भिवाजी चासकर यांनी दिली.
साकोरे येथील शासकीय पाणीपुरवठा विहिरीजवळ रविवारी (दि. 9) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बिबट्याची एक मादी दोन बछडे फिरताना दिसल्याचे मेंढपाळ जयवंत गाडे यांनी सांगितले.
वडगाव काशिंबेगमधील दत्त मंदिर रस्त्यावर माजी सरपंच भाऊसाहेब निघोट यांच्या घरासमोर बुधवारी (दि. 4) सायंकाळी दोन बिबटे मका पिकाच्या शेतात पळत गेले. तर मागील आठवड्यात साकोरे-चास रस्त्यावर शिंद्री ओढ्याजवळ शाळकरी मुलांच्या वाहनाला बिबट्या आडवा गेल्याची माहिती रूपाली चिखले यांनी दिली.
बिबट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातला असून दररोज बिबट्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे महिला, लहान मुले भयभीत झाली आहेत. या परिसरात सावजासह पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी जनमित्र दिनकरराव आवटे मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुदाम पडवळ, उपसरपंच अनिलबापू पडवळ यांनी केली.
स्थानिक मेंढपाळांच्या म्हणण्यानुसार, वन विभागाच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेत बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. बहुतांश मेंढपाळ आडाणी असून त्यांची या ठिकाणी शेती नसल्याने आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून शेताचे सातबारे न मिळाल्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. पंचनामे करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून फोटो, कागदपत्रे आणि जबाब मागण्यासह स्वतः पंच हजर राहण्यास सांगणे, तसेच उसाच्या शेतात ओढून नेलेली शेळी किंवा मेंढी शोधण्यास अनेक अडथळे येत आहेत. वेगवेगळ्या वेळा वेगवेगळी कागदपत्रे मागितल्यामुळे मेंढपाळ पंचनामा करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. ही माहिती माजी सरपंच भिवाजी महादेव चासकर यांनी दिली.