शंकर कवडे
पुणे: पोळ्यामुळे शेतकऱ्यांनी लिंबाची तोड कमी केल्याने शुक्रवारी मार्केट यार्डातील आवक अवघ्या ६०० गोण्यांवर आली. त्यात शनिवारची साप्ताहिक सुट्टी आणि श्रावण संपल्यामुळे सामिष पदार्थांच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन खानावळ, हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांनी खरेदी वाढविली. परिणामी, लिंबाच्या भावाला अक्षरशः 'फोडणी' मिळाली. शुक्रवारी १५ ते २० किलोंच्या गोणीने थेट तीन हजार रुपयांचा टप्पा गाठला. पावसाळ्यात लिंबाला मिळालेला हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव ठरला. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसत असून, २० रुपयांना अवघी दोन ते तीन लिंबे ग्राहकांच्या हाती पडत आहेत.
उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला की लिंबाचे दर आपोआप नरम होतात. यंदा मात्र बाजाराचे हे नेहमीचे गणितच उलटे झाले आहे. एप्रिल-मे महिन्यात लिंबाचा किरकोळ दर किलोमागे १४० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचला होता. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये कच्च्या आणि हिरव्या लिंबांचीही मोठ्या प्रमाणावर तोड केली. त्यात अल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून जूनअखेरपर्यंत लांबल्याने लिंबाची मागणी टिकून राहिली.
परिणामी, पुढील हंगामासाठी झाडांवर राहणारा माल कमी झाला. त्याचे परिणाम आता बाजारातील घटलेल्या आवकेच्या रूपाने दिसू लागले आहेत. एरवी पावसाळ्यात लिंबाची मागणी आणि भाव दोन्ही नरम असतात. यंदा मात्र परिस्थिती उलटी असून, एप्रिल-मेच्या कडक उन्हाळ्यानंतर प्रथमच लिंबाला पुन्हा 'उन्हाळी भाव' मिळाला असून, लिंबाने पुन्हा तीन हजार रुपये प्रतिगोणीपर्यंत झेप घेतली आहे. त्यामुळे सरबतापासून जेवणाच्या ताटापर्यंत हमखास लागणाऱ्या लिंबाची आंबट चव आता ग्राहकांच्या खिशालाही चांगलीच जाणवत आहे.
जून-जुलैच्या बेसुमार तोडीचा परिणाम
एप्रिल-मेतील चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये पुढील हंगामातील कच्च्या आणि हिरव्या लिंबांचीही मोठ्या प्रमाणावर तोड केली. त्यामुळे सध्या झाडांवरील तयार माल कमी पडत आहे. त्यात पोळ्यामुळे तोड घटली आणि शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीपूर्वी मागणी वाढली. या दुहेरी परिणामामुळे आवक-मागणीचे गणित बिघडून लिंबाने पावसाळ्यातच उन्हाळ्यातील भाव गाठला आहे.
मागील तीन दिवसांतील घाऊक बाजारातील लिंबाचे दर
९ सप्टेंबर--५०० ते २७००
१० सप्टेंबर --६०० ते २८००
११ सप्टेंबर --७०० ते ३०००
एरवी सप्टेंबरमध्ये मार्केट यार्डात दीड ते दोन हजार गोण्यांची आवक होते. सध्या ती मोठ्या प्रमाणात घटली आहे. जून-जुलैमध्ये झालेली मोठी तोड, पोळ्यामुळे कमी झालेली आवक, संपलेला श्रावण आणि शनिवारची साप्ताहिक सुट्टी या सर्वांचा परिणाम दरावर झाला. उन्हाळ्यानंतर प्रथमच लिंबाला पुन्हा उन्हाळ्यातील उच्चांकी भाव मिळत आहेत. रविवारी आवक वाढल्यानंतर दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असली, तरी पुढील महिनाभर तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.रोहन जाधव, लिंबाचे अडतदार, मार्केट यार्ड