Laxman Hake OBC Morcha Pudhari
पुणे

Laxman Hake OBC Morcha: परवानगी नाकारली तरी लक्ष्मण हाके मुंबईकडे मोर्चा नेण्यावर ठाम; पाटस टोलनाक्यावर तणाव

ओबीसी महाएल्गार मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त; पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक रोखली

पुढारी वृत्तसेवा

पाटस: पाटस (ता. दौंड) येथून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या ओबीसी महाएल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मोर्चा मुंबईच्या दिशेने नेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटस टोलनाका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पाटस टोलनाका परिसरात भेट देत लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली. पोलिस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाटस टोलनाका परिसरात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव दाखल झाले आहेत. मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. काही मोर्चेकरी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना अडवले.

यावेळी मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असून, पोलिसांकडून मोर्चा रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, लक्ष्मण हाके हे मोर्चा मुंबईच्या दिशेने नेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिस प्रशासन आणि मोर्चेकरी यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे पाटस टोलनाका परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, पुढील काही वेळात मोर्चाबाबत काय निर्णय होतो, तसेच पोलिस प्रशासन आणि मोर्चेकऱ्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT