खुटबाव: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपल्या मागण्यांसाठी पाटस टोल नाका ते मुंबई आझाद मैदान असा शेकडो आंदोलकांसह महाएल्गार मोर्चा मंगळवार (दि. १) पासून सुरू केला आहे.
या मोर्चाचा बुधवारी (दि. २) दुसरा दिवस असून, गेल्या वर्षी मनोज जरांगे यांनी मुंबई येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी केलेल्या बेमुदत उपोषणानंतर फडणवीस सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला होता. या जीआरला आज एक वर्षे पूर्ण झाली असून, या जीआरला विरोध करीत लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी सोलापूर-पुणे महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत येथे हैदराबाद गॅझेटच्या जीआरची होळी करीत फडणवीस सरकारचा निषेध केला.
या वेळी लक्ष्मण हाके म्हणाले, हैदराबाद गॅझेट जीआरला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, याचे औचित्य साधून या जीआरची होळी करीत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना विनंती आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानायचे की हैदराबाद गॅझेट मानायचे? याचा विचार त्यांनी केला पाहिजे. सरकारने दोन-तीन वर्षात याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. सरकार लोकशाही विरोधी असून, ओबीसीला रस्त्यावर आणण्यास भाग पाडत आहे. ओबीसीला आरक्षण नाकारायचे, ओबीसीला संधी नाकारायची आणि आमदार, मंत्री, खासदार यांनी आणि त्यांच्या लेका-बाळांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी कुणबीचे दाखले काढले आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांची आणि ओबीसींची संधी या सरकारने हिरावून घेतली असल्याचा आरोप हाके यांनी केला.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या मोर्चातील आंदोलकांचा मुक्काम सोमवारी रात्री यवत येथील समृद्धी मंगल कार्यालयात होता. मंगळवारी सकाळी १० वाजता मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ झाला. सरकार ओबीसींना ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मोर्चा थांबवणार नसल्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल स्वतः बंदोबस्तावर लक्ष ठेऊन आहेत.
ओबीसी संघर्ष एल्गार मोर्चा स्थगित
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवार (दि. १) पासून दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका ते मुंबई आझाद मैदान, असा पायी ओबीसी संघर्ष एल्गार मोर्चा सुरू केला होता. मात्र, बुधवारी (दि. २) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा मुंबईकडे कूच करीत असताना दौंड तालुक्यातील जावजीबुवाची येथे असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन लक्ष्मण हाके यांना आला. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. गणेश विसर्जनानंतर ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मराठा आरक्षण उपसमिती तसेच ओबीसी आरक्षण उपसमितीची ही बैठक ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात होईल. या अटीवर लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला ओबीसी एल्गार मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.