पुणे

शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी आता शेवटचा आठवडा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी जाहिराती देण्याची प्रक्रिया या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह भरती या प्रकारात पाहावयास मिळतील, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे दिली. बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीबाबत पात्र उमेदवारांमध्ये उत्कंठा आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हा प्रसिध्द होणार याची उमेदवार वाट पाहत आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे.

नुकतीच व्हिडीओ कॉन्फसन्सद्वारे याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. परंतु अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आणखी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागातर्फे भरातीबाबत प्रसिध्दी पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यामध्ये सेमी इंग्रजीसाठी डी.एड. इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे. त्याचप्रमाणे सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी.एड सह बी.एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षक पदभरतीसाठी दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करुन आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दि. 24 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने दि. 25 मे 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दि. 13 ऑक्टोबर 2023 नुसार साधन व्यक्तींसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बदल करण्यास दि. 30 जानेवारी 2024 पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होत्या.

दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दि. 31 जानेवारी 2024 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला. त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खासगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या. त्यादेखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खासगी संस्थांच्या जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दि. 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जाहिरातींची प्रक्रीया आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच शिक्षक भरती प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT