पुणे

उरुळी कांचन : प्रवाशांची संख्या मोठी; लोकल सेवेचा अभाव

अमृता चौगुले

उरुळी कांचन(पुणे) : पुणे शहराच्या विस्तारीकरणावर मर्यादा आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक आता शहरापासून जवळचा भाग असलेल्या परिसरात गुंतवणुकीला पसंती देत आहेत. शहराजवळील भागात शहराच्या तुलनेत कमी दरात उपलब्ध होत असलेल्या सदनिका किंवा गुंठेवारी यामुळे नागरीकरणाचा वेग पुणे शहराजवळील परिसरात वाढू लागला आहे. उरुळी कांचन परिसरात याचेच प्रतिबिंब उमटत आहे. त्यामुळे कौटुंबिक उत्पन्नाच्या मर्यादेत या ठिकाणी घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याने कामगार, नोकरदार वर्गाने या ठिकाणी गुंतवणूक करून पुणे शहरातून अप-डाऊन करीत आपला जीवनप्रवासाचा मार्ग शोधला आहे.

पुणे शहरातून उरुळी कांचन परिसराकडे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्गाची सुविधा असली तरी रस्ते व रेल्वे मार्गात समस्यांचा मोठा अभाव आहे. पुणे-सोलापूर महामार्गाची दुरवस्था, राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाला होणारा वेळ, वाहतूक कोंडी, पीएएमपीएमएलची अपुरी सेवा आणि त्याउलट या ठिकाणी वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे प्रवासी साधनांवर येणारी मर्यादा येऊ लागली आहे. भविष्यातील या ठिकाणी लोकसंख्येचा विचार करता पूर्व हवेली, दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्याला मध्यवर्ती भागात जोडणार्‍या या भागात लोकल सेवेचे जाळे व उपनगरीय रेल्वे सुविधा चालू घडीसह भविष्यात महत्त्वाची आहे.

दक्षिणेकडील राज्यांत रेल्वेने प्रमुख शहरांच्या उपनगरात 20 किलोमीटर अंतरावर ही उपनगरीय सेवा सुरू केली आहे. मात्र, पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असूनदेखील या ठिकाणी लोणावळा वगळता उपनगरीय सेवा सुरू नसल्याची परिस्थिती आहे. उरुळी कांचन शहराजवळ भविष्यात एमएसआरडीसीचा रिंग रोड, पुरंदर विमानतळ हे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा एक भाग म्हणून या परिसराला महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे उपनगरीय सेवेतून चालू समस्यांचा प्रश्न लवकर सुटण्यास मदत होणार आहे.

परप्रांतीय पर्यटक आणि भाविकांची कायम गैरसोय

उरुळी कांचन परिसरात सिंधी समाजाचे धर्मस्थळ असलेले प्रयागधाम आश्रम, जागतिक किर्तीचे बाएफ संशोधन संस्था, निसर्गोपचार आश्रम, पोल्ट्री व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आदी महत्त्वाची केंद्र आहेत. मात्र, रेल्वे प्रवासाच्या सुविधेचे सातत्य नसल्याने या संस्थांना भेट देणार्‍या परप्रांतीय नागरिकांची कायमच गैरसोय होत आली आहे. रेल्वेची सुविधा ठराविक अंतराने असल्याने अनेक वेळा या ठिकाणी इतर प्रवासी मार्गाने प्रवास करण्याची वेळ या प्रवाशांवर येते. अशीच काही अवस्था विद्यार्थी वर्गाची असून, पुणे प्रवासासाठी रेल्वेची ठराविक सुविधा कायमची गैरसोयीची ठरत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT