पौष्टिक, रुचकर रानभाज्यांना वाढती मागणी; विविध आजारांवर उपयुक्त | पुढारी

पौष्टिक, रुचकर रानभाज्यांना वाढती मागणी; विविध आजारांवर उपयुक्त

सुषमा नेहरकर

पुणे : कोरोना महामारीनंतर पौष्टिक व आरोग्यदायक आहाराचे महत्त्व खूपच वाढले आहे. लोक आपल्या पारंपरिक जीवनशैलीकडे वळू लागले आहेत. याचमुळे लोकांकडून श्रावणात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्‍या पौष्टिक, रुचकर आणि आरोग्यदायक रानभाज्यांची मागणी वाढत चालली आहे. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर या निसर्गरम्य तालुक्यांत पश्चिम पट्ट्यात सध्या मुबलक प्रमाणात रानभाज्या उपलब्ध आहेत.

सह्याद्रीच्या घाटात दर वर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या उगवतात. पावसाळी हवामानात वाढणार्‍या या भाज्या अतिशय पौष्टिक, औषधी व चविष्ट असतात. रानभाज्यांविषयी अनेकांना कुतूहल व खाण्याची उत्सुकता असते. मात्र, या भाज्यांची अनेकांना माहिती नसते.
पावसाळ्यात रानात, शेताच्या बांधावर, माळरानावर, झुडपांमध्ये या रानभाज्या उगवतात. यामध्ये कंद, फूल, फळ, शेंगभाज्या, बियांपासून तयार होणार्‍या अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत. आदिवासींना याची चांगली माहिती असते. ते रानात फिरून भाज्या गोळा करतात. यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा होतोच याहीपेक्षा निसर्गाशी त्यांची नाळ जुळून राहते. काही ठिकाणी डोंगराळ भागात राहणारे लोक या भाज्या गोळा करतात आणि जवळच्या बाजारपेठेत विकतात.

रानभाज्यांची माहिती पुढीलप्रमाणे

म्हैसवेलाची पाने : वेल वर्गातील या भाजीच्या पानांची भाजी केली जाते. म्हशीच्या तोंडासारखा पानांचा आकार असल्याने त्याला म्हैसवेलाची पाने म्हणतात. अळूच्या वड्या जशा बनवल्या जातात, तशाच या पानांच्या वड्या करून खाल्ल्या जातात किंवा सुकी भाजीदेखील बनवली जाते.
चाव्याचा बार : चाव्याच्या वेलाला नंतर फुले येतात. या फुलांची भाजी बनवली जाते. छोट्या अंड्यांप्रमाणे ही फुले असतात. हिरवी मिरची व कांद्यामध्ये परतून याची भाजी केली जाते. ही भाजी अतिशय औषधी असून
स्वादिष्ट लागते.

पौष्टिक, रुचकर रानभाज्यांना वाढती मागणी

चिचारडी : पित्तावर अतिशय गुणकारी असणारी ही भाजी अतिशय कडवट असते. चिचारडीचे झाड काटेरी असते. झुडपांमध्ये ही झाडे उगवतात. चिचारडी काढताना खूप काटे टोचतात. चिचुरडी ठेवून, पाण्यात उकळून पिळून घेऊन मग भाजी केली जाते.
कवदर : डोंगराच्या कातळ दगडामध्ये रानकेळी उगवतात. या रानकेळींवर सुरुवातीला येणार्‍या कोवळ्या केगाला कवदर म्हणतात. या कोवळ्या केंगामधील कोंबडा काढून टाकावा लागतो व नंतर त्याची भाजी केली जाते. याची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते.
रुखाळू : अळूच्या पानांसारखे असणारे रुखाळू उंबर, आंबा, सागाच्या झाडांवर खोडामध्ये उगवतात. नुसते पान खाल्ले तर तोंडात प्रचंड चुणचुण होते. यासाठी चिंचगुळामध्ये ही भाजी बनवली जाते.
भारिंग: भारिंग याच्या फुलांची व कोवळ्या पानांची भाजी केली जाते. साधारण कडवट लागणारी ही भाजी कांदा-लसूण टाकून परतून केली जाते.
चाव्याचे कवळे : पाऊस पडल्याबरोबर चाव्याचे वेल उगवतात. या उगवलेल्या वेलाचे कोवळे कोंब तोडून त्याची भाजी केली जाते. हे कोंब कांद्याच्या पातीसारखे कापून त्यांची भाजी बनवली जाते.
करटुली : वेलाला येणारी करटुली करल्यासारखी काटेरी असतात. याची भाजी कारल्यासारखीच मसाला लावून रस्सा अथवा कोरडी बनवतात. मधुमेह व रक्ताशी निगडित आजार असल्यास ही भाजी खाल्ली जाते.
करंद : ही भाजी कंद वर्गातील असून रताळे, बटाट्यासारखी असते. याचा कंद लाल रंगाचा असतो. ही भाजी उपवासाला खाल्ली जाते व बनवण्याची पध्दतदेखील बटाट्याच्या तसेच रताळ्याच्या सारखीच आहे. दम्यासाठी ही गुणकारी मानली जाते.

रानतोंडली, तेरा, तांदुळजा…
रानभाज्या मधुमेह, पोटदुखी, खोकला, वात आदी आजारांवर उपयुक्त आहेत. याचबरोबर कंद वर्गातील हाळिंद, खरबुडी, तर फळ वर्गातील रानकेळी, मिकी, रानतोंडली, पालेभाज्यांमध्ये कोळू आघाड्याची पाने, तेरा, तांदुळजा, फांदी, शेवाळे, हादगा, रानभेंडी, बांबूचे कोवळे कोंब, भोपळ्याची कोवळी फुले यांच्यादेखील भाज्या केल्या जातात.

Back to top button