दौंडला 3 स्कूल बस व 6 खासगी बसवर कारवाई | पुढारी

दौंडला 3 स्कूल बस व 6 खासगी बसवर कारवाई

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : स्कूल बस व खासगी प्रवाशी बस याबाबत बारामती उपप्रादेशिक परिवहन विभाग आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत दौंडच्या विविध भागातील 3 स्कूल बस व 6 खासगी बस असे एकूण 9 बसवर दंडात्मक कारवाई करून 2 दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्कूल बस व खासगी बसच्या तक्रारी वाढत आहेत. स्कूल बस व खासगी बससाठी असलेले नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. स्कूल बस परवाना नसतानाही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. खासगी बसचा स्कूल बस म्हणून उपयोग केला जातो. अनेक स्कूल बसची दुरवस्था झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. बसमध्ये विद्यार्थ्यांनी (मुली) असतील तर त्या बसमध्ये एक महिला असणे बंधनकारक आहे. मात्र, तसे दिसून येत नाही. खासगी बस व स्कूल बससाठी असलेल्या नियमांना पायदळी तुडवून कारभार सुरू असतो. या पार्श्वभूमीवर स्कूल बस व खासगी बसवर कारवाई करणे गरजेचे झाले होते.

मंगळवारी (दि. 1) एकूण 9 बसवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दौंड-पाटस रस्त्यावरील मेरी मेमोरियल स्कूल या शाळेच्या दोन बसचा समावेश आहे. दोन्ही बस दौंड पोलिस ठाण्यासमोर अटकावून ठेवण्यात आल्या आहेत. अशा इतर बेकायदेशीर बसवर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे. तिसरी स्कूल बस सोमेश्वर परिसरातील आहे. 6 खासगी प्रवाशी बस विविध भागातील आहेत. यापुढेही अशा प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक हेमंतकुमार सोलणकर, सहायक मोटार वाहन निरीक्षक हेमलता मुळीक, अमरसिंह चोथे, प्रतीक मोहिते, विठ्ठल गावडे यांचा सहभाग होता.

मंगळवार (दि. 1) पासून परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये या कार्यालयाकडून स्कूल बस व खासगी प्रवासी बसची वायुवेग पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईत दोषी वाहनावर व वाहनचालक यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येत असून, वाहन अटकावून ठेवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्कूल बसचालक व मालक यांनी वाहनांचे सर्व कागदपत्र वैध करून घ्यावेत. त्यानंतर वाहन रस्त्यावर आणावे.

– राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

Back to top button