सासवड: छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (दि. २२) रात्री मोठी दरड कोसळली. या दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि राडारोडा साचला असून, मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गेल्या चार दिवसांपासून पुरंदर परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील मातीची पकड सैल झाल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शुक्रवारी रात्री किल्ल्याच्या मार्गावरील तिसऱ्या टप्प्यात दरड कोसळली. (Latest Pune News)
रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठा अपघात टळला असला तरी सकाळी किल्ल्यावर जाणाऱ्या स्थानिकांना रस्त्यावरील चिखल आणि दगडांचा प्रचंड पसारा दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती माध्यमांना दिली.
या घटनेचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पर्यटक आणि शिवभक्तांमध्ये चिंता पसरली आहे. पुरंदर किल्ला हा सध्या लष्कराच्या ताब्यात असून, दररोज हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात. त्यामुळे अशा दरडीच्या घटनांमुळे त्यांचा प्रवास धोकादायक ठरत आहे.
प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रस्त्याची साफसफाई करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत का, याबाबतही संभ्रम कायम आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.
सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि राडारोडा असल्याने पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. सततच्या पावसामुळे पुढील काही दिवस दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.