पुणे: राज्य शासनाच्या धर्तीवर पुणे महापालिकेत कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला असला, तरी वेळेचे काटेकोर पालन न करणार्या लेटलतिफांना शुक्रवारी (दि. 22) महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मोठा दणका दिला.
सकाळी अचानक तपासणी करीत मुख्यालयात उशिरा आलेल्या तब्बल 550 कर्मचारी व 6 विभागप्रमुखांना गेट बाहेरच थांबविण्यात आले. यानंतर त्यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली.
महापालिकेची कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी निश्चित असली, तरी अनेक अधिकारी व कर्मचारी 12 वाजूनही कार्यालयात आले नव्हते. यामुळे नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्तांना मिळाल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी स्वतःच कठोर भूमिका घेत शुक्रवारी उशिरा येणार्या कर्मचार्यांवर कारवाई केली. पगार विभागातील क्लार्क यांच्यासह सर्व उशिरा आलेल्या कर्मचार्यांची नोंद घेऊन त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या.
गेल्या काही वर्षांपासून प्रशासकराज सुरू असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद मिळत नाही. विभागप्रमुख मनमानी करीत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे आतातरी शिस्त बसणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारपासूनच अनेक अधिकारी व कर्मचारी गायब होतात, असा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा प्रत्यक्षात ‘चार दिवसांचा’ ठरत आहे. त्याशिवाय जेवणाची ठरलेली अर्ध्या तासाची वेळ सोडून काही विभागांतील अधिकारी दीड वाजताच हॉटेलवर रवाना होतात. कार्यालयीन कामकाज दुपारी उशिरा सुरू होते.
सायंकाळी साडेपाचला कार्यालय सोडण्याचेही प्रकार नेहमीचे झाले आहेत. नागरिकांना भेटण्यासाठी प्रत्येक सोमवारी व गुरुवारी खास वेळ निश्चित करण्याचे आदेश असूनही अनेक विभागप्रमुखांनी ते पाळलेले नाहीत. त्यामुळे नागरिक थेट आयुक्तांकडे तक्रार घेऊन जात आहेत.