

Ajit Pawar enters Zilla Parishad politics
पुणे: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने तयारीला लागण्याचे आवाहन केले आणि पक्ष म्हणून नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचे निर्देश दिले.
पुणे शहरातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधून आलेल्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग घेतला. बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकर मांडेकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. (Latest Pune News)
निवडणुकीची तयारी आणि राजकीय आढावा
अजित पवार यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकार्यांशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून तालुक्याचा राजकीय आढावा घेतला आणि सध्याची परिस्थिती जाणून घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याने पक्षसंघटना मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. अजित पवारांनी समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांनी काही विकासकामांची परिस्थिती जाणून घेतली आणि त्यामध्ये येणार्या अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले.
कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन
या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील समस्या आणि प्रश्न मांडले. अजित पवार यांनी हे प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या धोरणांना लोकांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहचविता येईल, यावरही चर्चा झाली.
महायुतीची चर्चा; मात्र तुम्ही प्रचार सुरू करा
या बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांना, ‘पुढील निवडणूक महायुतीसोबत लढविल्या जाणार का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, ‘युतीबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. वरिष्ठपातळीवर यावर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय होईल. मात्र, तोपर्यंत थांबण्याचे काही कारण नाही. स्थानिक पातळीवर उमेदवारांनी आपला प्रचार सुरू करावा. युतीबाबत जो काही निर्णय होईल तो तुम्हाला कळविण्यात येईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
दलित युवा पँथर्स जिल्हाध्यक्षांचा गोंधळ
या बैठकीदरम्यान राजगड तालुक्यातील दलित युवा पँथर्सचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. राजगडमधील रस्ते आणि वाढती गुन्हेगारी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर ते अजित पवारांना निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, बैठक सुरू असल्यामुळे त्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून त्यांनी तीव— नाराजी व्यक्त केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संवाद साधला. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत येणार्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या.
- प्रदीप गारटकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष