पुणे

पुणे : घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी

अमृता चौगुले

हडपसर : पुढारी वृत्तसेवा :  'कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन भाडेकरू दहशतवादी असल्याचे नुकतेच समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर परिसरातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती तत्काळ पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी केले आहे. हडपसर परिसरात घरे भाडेतत्त्वाने देण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या भागात बाहेरून आलेल्या लोकांची संख्या लाखोच्या घरात आहे. आयटी कंपनीसह कष्टकरी वर्गाचा समावेश यात आहे. महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्यामध्ये देणे बंधनकारक असतानाही परिसरातील घरमालकांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

भाडेकरूची पुरेशी माहिती न घेताच त्यांना घरे भाड्याने दिले जात आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही माहिती दिली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोंढवा येथे दोन भाडेकरू दहशतवादी निघाल्यानंतर कोंढवा, हडपसर, मुंढवा, वानवडी आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांनी पत्रक काढून घर मालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हडपसर परिसरातील घरमालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूंची माहिती, त्यांचे फोटो पोलिस ठाण्यात द्यावेत. याबाबत पोलिसांकडून सर्व्हे केला जात आहे. घरमालकांनी भाडेकरूची माहिती लपवल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
                        -रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस स्टेशन 

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT