पुणे

Lalit Patil case : ललित पाटील प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवा : रवींद्र धंगेकर

अमृता चौगुले

पुणे : ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा अमली पदार्थांचा व्यवसाय पोलिस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या संगनमताने तुरुंगातून, रुग्णालयातून करीत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास संथ गतीने आणि संशयास्पदरीतीने सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये गुंतलेले आजी-माजी पोलिस अधिकारी, मंत्रिमंडळातील काही व्यक्ती, पुण्यातील गुन्हेगार यांना वाचवण्यासाठी ललित पाटीलचा एन्काउंटर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्यावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

धंगेकर म्हणाले, ससूनच्या डीनचे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजेत. कोणत्या मंत्र्यांनी त्यांना फोन केले, हे आपोआप बाहेर येईल. डीन अजूनही या प्रकरणाबाबत गप्प आहेत. जणू काही आपल्याला त्यातील काही माहितीच नाही, असा त्यांचा वावर दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात डीनना सहआरोपी केले पाहिजे. धंगेकर म्हणाले, बंडगार्डन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी, त्यांचा वसुलीदार यांना ललित पाटीलचे काळे धंदे माहीत होते आणि तेही त्याच्या संपर्कात होते. अमली पदार्थ विकण्यासाठी ते पाटीलला मदत करीत होते.

पाटीलला पोलिस अधिकार्‍यांचे व्हिडीओ कॉल

ललित पाटीलला अटक होण्याच्या दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी पाटीलशी व्हिडीओ कॉलवर बोलल्याचे पुरावे पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचले आहेत. याचाच अर्थ पाटील पोलिसांच्या संपर्कात होता. त्याच्या सर्व हालचालींविषयी पोलिसांना माहिती होती. पाटीलला अटक करण्याच्या आदल्या दिवशी गृहमंत्र्यांनी ललित पाटीलला लवकरच अटक केली जाईल, असे विधान केले होते. याचाच अर्थ पाटीलविषयी पोलिसांना सर्व काही माहीत होते, असाही आरोप धंगेकर यांनी केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT