पुणे

सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृतीचा अभाव : जागृतीसाठी शासन राबविणार मोहीम

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतात दरवर्षी सुमारे 75,000 महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान होते. कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, 2025 पर्यंत अंदाजे 85,241 रुग्ण बाधित होतील, असा अंदाज आहे. डॉक्टर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (सर्व्हायकल कॅन्सर) प्रमाण कमी करण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. अंमलबजावणीपूर्वी कर्करोगाबाबतची अनभिज्ञता दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी तपासणीवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती हे आरोग्य क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. इतर प्रकारच्या कर्करोगांच्या तुलनेत सर्व्हायकल कॅन्सरची दृश्य लक्षणे नसल्याने पटकन निदान होत नाही. जनजागृतीच्या अभावामुळे तरुणी आणि महिलांमध्ये तपासणी करून घेण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर उपचार, हे सूत्र या कर्करोगाबाबतीत राबविणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लस कोणी घ्यावी आणि परिणामकारकता किती?

डॉक्टरांच्या मते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसविरोधातील लस 9 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना लस देणे उपयुक्त ठरते. मुलींना दोन डोसमध्ये लस दिली जाते. पहिला डोस घेतल्यावर सहा महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. ज्या मुलींना ही लस देण्यात आली नसेल, त्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत लस घेऊ शकतात. त्यांना लसीचे तीन डोस घ्यावे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जवळपास 90 टक्के नोकरदार महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस घेत नाहीत.  कारण, सर्व्हायकल कॅन्सरवर लस उपलब्ध आहे, हे त्यांना माहितीच नसते. हा कर्करोग प्रामुख्याने मानवी पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. किशोरवयीन आणि तरुण मुलींमध्ये एचपीव्ही संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते. ज्या स्त्रिया लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेत, त्यांनी न चुकता तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

– डॉ. मलेश बोकील, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट

एचपीव्ही लस आणि नियमित पॅप स्मीअर्सचा गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जीवन वाचवणारी साधने म्हणून महत्त्वाची आहेत. लसीकरणामुळे मानवी पॅपिलोमा व्हायरसचा संसर्ग रोखून धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो. गर्भाशय ग्रीवेमधील असामान्य पेशी बदल लवकर ओळखण्यासाठी नियमित पॅप स्मिअर चाचणी महत्त्वपूर्ण आहे. महिलांनी सर्व्हायकल कर्करोगापासून वाचण्यासाठी नियमित पॅप स्मीअर चाचणी आणि एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे.

– डॉ. मृणाल परब, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT