‘चला जाणूया नदीला’मध्ये जिल्हा परिषदेचा सहभाग : रमेश चव्हाण | पुढारी

‘चला जाणूया नदीला’मध्ये जिल्हा परिषदेचा सहभाग : रमेश चव्हाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नद्या या मानवी संस्कृतीसाठी कायमच महत्त्वाच्या राहिल्या असून, आताच्या आणि भावी पिढीच्या अस्तित्वासाठी त्यांचे प्रवाही राहणे गरजेचे आहे. यादृष्टीने जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले ’चला जाणूया नदीला’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत करण्यात येतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेत पाणितज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण बोलत होते.

बैठकीस जि. प. सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता आप्पासाहेब गुजर, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, जलबिरादरी महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुग, सदस्य सुमंत पांडे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ’चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी जलबिरादरीला जिल्हा परिषदेचे सर्व ते साहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. नदी यात्रा झाल्यानंतर प्राप्त सर्वंकष अहवालांच्या अनुषंगाने नदी पुनरुज्जीवनासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.

नदी प्रवाही करण्यासाठी नदीला येऊन मिळणारे सर्व नाले, संरचना खुल्या करून प्रवाहित करणे गरजेचे आहे. विविध नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांमध्ये ही बाब प्रकर्षाने लक्षात आली असून, त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्याचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले. जिल्ह्यात एकूण 11 नद्या या अभियानात समाविष्ट आहेत.

हेही वाचा

Back to top button