कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील मेलझर केमिकल कंपनीत विट बांधकामाची भींत अंगावर पडून दोन परप्रांतीय मजूर महिला कामगार ठार झाल्या, तर एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर व सुपरवायझर या दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Pune News)
जयकुमार रामचंद्र मुंडफणे (वय ४६, रा. मांजरी ग्रीन्स फेज ५, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) आणि अक्षय भानुदास मोरे (वय २८, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, असे गुन्हा दाखल असल्यांची नावे आहेत. ममतादेवी सुदाम दास (वय २७ ), सोनीदेवी सरयु कुमार (वय २८, दोघी सध्या रा. मुकादमवाडी पांढरेवाडी, ता. दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांचे नाव आहे. गितादेवी बाबुलाल कोल (मुळ रा. जिल्हा रेवा, राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. मुकादमवाडी, ता. दौंड) असे जखमीचे नाव आहे. याबाबत संजय धनीराम नगरे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरूवारी (दि.१६) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील कंपनीत लांबी ५० मीटर, उंची १५ फुट व ९ इंचीच्या विटांचे बांधकाम सुरू होते. याठिकाणी परप्रांतीय महिला कामगार काम करत होत्या. भिंतीचे बांधकाम ओले असताना बाहेरील बाजूने भिंतीलगत जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम सुरू होते. मातीचा भरावामुळे दबाव वाढल्याने भिंत आतील बाजूस कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली वरील ३ महिला अडकल्या होत्या. तिथे उपस्थित असणारे नागरीकांच्या यांच्या मदतीने भिंतीच्या ढिगाऱ्याखालून महिलांना बाहेर काढून उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी दोन महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.