Shree Kshetra Kundeshwar Devasthan Kadus
राजगुरुनगर/कडूस/भामा आसखेड : खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर देवदर्शनासाठी चाललेल्या पीकअप गाडीचा भीषण अपघात झाला. ही पीकअप गाडी पाच ते सहा पलटी घेत तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळली. पीकअप गाडीत क्षमतेपेक्षा अधिक तब्बल ३८ महिला, मुलं खच्चून भरली होती. या अपघातामध्ये १० भाविक महिलांचा मृत्यू झाला असून, सुमारे २८ महिला, मुलं गंभीर जखमी आहेत. जखमींवर राजगुरुनगर, चाकण व भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत शोभा ज्ञानेश्वर पापळ (वय २७), सुमन काळूराम पापळ (वय ४७), शारदा रामदास चोरघे (वय ४५), मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर (वय ५५), मिराबाई संभाजी चोरघे (वय ५५), बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे (वय ५०), पार्वताबाई दत्तू पापळ आणि फसाबाई दत्तू सावंत या १० महिला भाविकांचा मृत्यू झाला.
यासह अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरघे, जया बाळू दरेकर, लताताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ, शकुंतला चोरघे, मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सिद्धी ज्ञानेश्वर पापळ, कविता सारंग चोरघे, सुलाबाई बाळासाहेब चोरघे, सिद्धीकार रामदास चोरघे, छबाबाई निवृत्ती पापळ, सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, पूनम वनाजी पापळ, जाईबाई वनाजी पापळ, चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर आणि मंदा चांगदेव पापळ या महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रावणी सोमवारनिमित्त पाईट गावच्या पापळवाडी येथील ३८ जण कुंडेश्वर देवदर्शनासाठी सोमवारी (दि. ११) साडेअकराच्या दरम्यान गावातीलच पीकअप करून निघाले. या पीकअपमध्ये क्षमतेपेक्षा खूपच अधिक लोक बसले होते. यात तब्बल ३० महिला, ५ लहान मुले व २ पुरुष होते. कुंडेश्वर देवस्थान डोंगरावर असून मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद, तीव्र उतार व प्रचंड वळणांचा आहे. या घाटरस्त्यावर पीकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व पीकअपने पाच ते सहा पलटी घेत तब्बल १०० फूट दरीमध्ये कोसळली.
मृतांची नावे :
साळुंखे रुग्णालय
१. शोभा जानेश्वर पापळ
२ सुमन काळुशम पापळ
३ शारदा रामदास चोरघे
४. शंकुतला तान्हाजी चोरघे
चांडोली रुग्णालय
१. मंदा कान्हीफ दरेकर
२. संजीवनी कैलास दरेकर
३. मीराबाई संभाजी चोरघे
गावडे रुग्णालय
१. बायडाबाई दरेकर
२ पार्वताबाई दत्तू पापळ
३ फसाबाई दत्तू सावंत
श्रावणी सोमवारनिमित्त या रस्त्यावर भाविकांची गर्दी असल्याने अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून गेले. परंतु वाहनांमधील महिलांची संख्या अधिक असल्याने अपघाताची भीषणता खूपच वाढली. जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर हादरवून सोडल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था व स्थानिक पातळीवर आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन मात्र नेहमीप्रमाणेच वेळेवर पोहचले नाही.
आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे
पाईट गाव राजगुरुनगर शहरापासून सुमारे २० ते २२ किलोमीटरवर असून, अपघात झालेले ठिकाण आणखी ५ किलोमीटर आतमध्ये आहे. पीकअपचा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीला धावून गेले. परंतु अपघाताची भीषणता लक्षात आल्यानंतर गंभीर जखमी महिलांना उपचाराकरिता दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाची आवश्यकता होती. शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेसाठी फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पाईट गावातदेखील खासगी अथवा सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अपघाताचे गांभीर्य लक्षात येताच राजगुरुनगर येथून रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. तोपर्यंत स्थानिकांनी सर्व गंभीर जखमी महिलांना पाईट येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु रुग्णालयाची क्षमता व सुविधांचा अभाव यामुळे सर्व गंभीर रुग्णांना राजगुरुनगर येथे घेऊन येण्याशिवाय पर्याय उरला नाही. परंतू या सर्व जुळवाजुळवीत दोन ते अडीच तास निघून गेले. गंभीर रुग्ण राजगुरुनगर येथे पोहचण्यासाठी दोन- तीन तास लागल्याने केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने तीन ते चार महिलांचा मृत्यू झाला.
रस्त्यांची दुरवस्था
शिरोली-पाईट ते वांद्रे रस्त्याची अतिप्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. भविष्यात गंभीर अपघात झाला तर फार मोठी किंमत चुकवावी लागले, या स्वरुपाच्या अनेक व सातत्याने बातम्या छापण्यात आल्या. परंतु त्यानंतर देखील या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अथवा डागडुजीकडे लक्ष देण्यात आले नाही. अखेर कुंडेश्वर अपघात दुर्घटनेनंतर रस्त्याची दुरवस्था असल्याने रुग्णवाहिका पोहचण्यास विलंब झाला व नाहक गंभीर चार ते पाच रुग्णांचे मृत्यू झाले.
'महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या वाहन अपघातात अनेक महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी प्रार्थना करते,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
पुणे येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले. या दुर्घटनेत आपले जिवलग गमावलेल्या सर्वांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो, अशा संवेदना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये दिले जातील. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील,'पंतप्रधान नरेंद्र मोदी
अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुख:द आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगात आमच्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या अपघातात सुमारे २० पेक्षा अधिक जखमी झाले असून, त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्यात येत असून, मी स्वत: पोलिस आयुक्तांशी संपर्कात आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.- अजित पवार, पालकमंत्री व उपमुख्यमंत्री